Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार यांच्या निधनानंतर खासदार शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महाराष्टाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.

Sharad Pawar Comment on Ajit Pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. ते बारामतीच्या दौऱ्यावर होते. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ते बारामती तालुक्यात एकूण चार सभा घेणार होते. परंतु बारामतीतील विमानतळावर लँडिंग होत असतानाच त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच नेते बारामतीत जमले असून अनेक बड्या नेत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. दुसरीकडे संपूर्ण पवार कुटुंबीयदेखील बारामतीत दाखल झाले आहे. पवार यांच्या पार्थिवावर 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, अजितदादांच्या अपघाती निधनानंतर खासदार शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे काका म्हणजेच खासदार शरद पवार हेदेखील बारामतीत दाखल झाले आहेत. त्यांनी बारामतीतील शासकीय रुग्णालयात जाऊन अजित पवार यांचे अंत्यदर्शन घेतले आहे. त्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्यासोबत झालेला हा निव्वळ अपघात आहे. यात राजकारण नाही. महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
कृपया यात राजकारण आणू नका
अजित पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. एक मेहनती नेता आपल्यातून गेल्याने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्याचं जे नुकसान झालंय ते भरून येण्यासारखं नाहीये. आजही काही गोष्टी आपल्या हातात नाहीत. मी आज सकाळी विनायकरावांना भेटलो. काही दुष्ट शक्ती या अपघातामागे राजकारण तर नाही ना? अशा प्रकारची विधानं जाणूनबुजून करत आहेत. यात काहीही राजकारण नाही. हा केवळ एक अपघात होता. याच्या यातना महाराष्ट्राला आणि आम्हा सर्वांना आहे, असेही पुढे शरद पवार म्हणाले. तसेच कृपया यात राजकारण आणू नये, अशी विनंतीही त्यांनी व्यक्त केली.
नरेंद्र मोदी, अमित शाहा बारामतीत येणार
दरम्यान, अजित पवार यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी टेवले जाणार आहे. त्यामुळे हजारो लोकांनी बारामतीत गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हेदेखील बारामतीत येणार आहेत. अंत्यसंस्काराची तयारी केली जात आहे. बारामतीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
