
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. मोदी यांच्या या विधानावर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवला आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर मोदींच्या या विधानावर संताप व्यक्त केला आहे. शरद पवार यांना पराभूत करणं शक्य नाही. शरद पवार मरत नाही, तोपर्यंत आपल्याला महाराष्ट्र मिळत नाही ही त्यांच्या मनातील चिवचिव आहे. शरद पवार यांच्या मृत्यूची प्रार्थना महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशाराच जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मीडियाशी संवाद साधताना हा संताप व्यक्त केला. शरद पवारांच्या मृत्यूची प्रार्थना करत आहेत, हे महाराष्ट्र सहन करणार नाही. राजकीय विरोध असू शकतो. पण कुणाच्या मरणाची इच्छा व्यक्त करणे याच्यासारखा खालच्या दर्जाचा विचार असू शकत नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
मृत्यू झाल्यानंतरच आपण आत्म्याची गोष्ट करतो. त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं? शरद पवार मरत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र आपल्याला मिळणार नाही ही त्यांच्या मनातील चिवचिव त्यांना सातवतेय. म्हणूनच अशी भाषा केली जाते. ही भाषाच योग्य नाही, असं आव्हाड म्हणाले.
भाजपच्या 15 खासदारांनी स्टेजवर बोलताना संविधान बदलून टाकणार असं विधान केलंय. त्यानंतर हे सगळं अंगावर येतेय असं दिसल्यानंतर पुन्हा माघार घेतली. बोलायला कोणतेच विषय नाहीत त्यामुळे हे भटकती आत्मा, मंगळसूत्र असे विषय काढत आहेत. मणिपूरच्या वेळेस मंगळसूत्र आठवले नाही का? असं अचानक तुम्हाला महिला वर्ग कसा आठवला? कुणावर वैयक्तिक बोलायचं नसतं. पण स्त्री प्रेमावर बोलायचं अधिकार कोणाला असतो? असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही घणाघाती हल्ला चढवला. भाजपने मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडून ठेवले आहे. कल्याण-डोंबिवलीत भाजप उतरायला तयार नाही आणि ठाण्यात आम्हाला सीट पाहिजे याचा दबाव कायम ठेवलाय. आपल्या घरात आपण राजे असतो. परक्याच्या घरात नाही अशीच काहीशी स्थिती आहे. ही स्थिती होणार होती. तुमचा वापर केला जाणार होता, हे तुम्हाला आधीच कळायला पाहिजे होतं. दुर्दैवाने ज्या घरात पंचपक्वान्न होते, ज्या घरात सोन्याच्या ताटात बसून जेवत होते, तुम्हाला पत्रावळीवर जायची इच्छा निर्माण झाली. तुम्ही वाटोळे करून घेतलं, अशी टीका आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.