Uddhav Thackrey : जास्त बोलू नका… बिनपाण्याने… उद्धव ठाकरेंचा कुणाला इशारा
एकनाथ शिंदेंच्या "अर्धी दाढी" वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार पलटवार केला आहे. शिंदेंनी केलेल्या टोलेबाजीला उद्धव यांनी सामनाच्या मुलाखतीत प्रत्युत्तर देत शिंदेंना खडेबोल सुनावले. शिवसेनेतील फूट आणि भाजप नेत्यांनी शिवसेना संपवण्याबाबत केलेल्या विधानांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

मी फक्त अर्ध्या दाढीवरून हात फिरवला आमि हे लोकं आडवे झाले, पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता तर काय होईल, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात केलं होतं. कोणांचही स्पष्टपणे नाव न घेताही शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना हा टोला लगावला होता. हिंदीसक्तीचा अध्यादेश मागे घेतल्यावर 5 जुलै रोजी वरळी डोम येथे पार पडलेल्या विजयी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यावरच एकनाथ शिंदेंनीही उद्धव यांना चोख प्रत्युत्तर देत, मी पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार केला पाहिजे, असं म्हटलं होतं.
मात्र त्यांच्या याच वक्तव्याचा समाचारा घेत आता उद्धव ठाकरेंनीही शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे. सामना या शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी यावर बाष्य केलं. संजय राऊत यांनी शिंदेंवरून प्रश्न विचारला असता ुद्धव ठाकरे म्हणाले, ” त्यांची अर्धी दाढी राहिलीय हे नशीब. त्यांनी जास्त बोलू नये, नाहीतर लोक त्यांची बिनपाण्याने करतील. राहिलेली अर्धी दाढीही काढतील. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, तिथे दाढीचा उपयोग का करत नाहीत, ते प्रश्न का सोडवत नाहीत?” असं सडेतोड उत्तर उद्धव यांनी दिलं.
चला एक ‘बला’ गेली! कोणाबद्दल म्हणाले उद्धव ठाकरे ?
शिवसेना पक्षातून जे आऊटगोईंग सुरू आहे, त्यावरही उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. ” काही वेळेला साचलेल्या डबक्याला थोडासा आऊटलेट द्यावा लागतो आणि नवीन झरा यावा लागतो. कधी कधी भावनेच्या भरात किंवा प्रेमापोटी एखादा माणूस अयोग्य असला तरी आपण बाजूला करत नाही, पण जेव्हा तो स्वतःहून जातो आणि त्याची जागा दुसरा घेतो तेव्हा बरं वाटतं की, चला एक ‘बला’ गेली! आता जे आमच्यातून गेले ते तिकडे जाऊन काय दिवे लावताहेत ते तुम्ही बघताच आहात. त्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना कोणी संपवू शकत नाही…
तर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी शिवेसेनेला जमीनदोस्त करण्याची भाषा केली. त्यांच्या या दाव्यावरही उद्धव यांनी सडेतोड उत्तर दिलं.’ शिवसेना जमिनीचा दोस्तच आहे म्हणून तर हे लोक शिवसेना संपवू शकत नाहीत’. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि मुळं जमिनीत खोलवर गेलेली आहेत. तुम्ही जमिनीचे शत्रू आहात म्हणून तुम्ही मुंबईसह सगळी जमीन तुमच्या मित्राच्या घशात घालत आहात. तुम्ही जमिनीचे शत्रू आणि आम्ही जमिनीशी दोस्ती करणारे दोस्त आहोत अशा शब्दांत उद्धव यांनी गिरीश महाजनांवर पलटवार केला.
