उद्धवजी तेव्हा…, योगेश कदम यांचा ठाकरेंना थेट सवाल, नेमकं काय म्हणाले?
योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे, तसेच त्यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांच्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली, या मुलाखतीवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धवजी तेव्हा सोनिया गांधींना भेटायला दिल्लीला गेले होते? त्याचं काय? महाविकास आघाडी असताना मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही काँग्रेस सोबत गेलात त्याचं काय? हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवला काँग्रेसची साथ तुम्ही स्वीकारली त्याचं काय? असा सवाल योगेश कदम यांनी उपस्थित केला आहे.
नेमकं काय म्हणाले कदम?
उद्धवजी तेव्हा सोनिया गांधींना भेटायला दिल्लीला गेले होते? त्याचं काय? महाविकास आघाडी असताना मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही काँग्रेस सोबत गेलात त्याचं काय? हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवला काँग्रेसची साथ तुम्ही स्वीकारली त्याचं काय? वंदनीय बाळासाहेब असते तर हे त्यांनी केलं असतं का? हे त्यांनी स्वतःला विचारवं, एक बोट तुम्ही दुसऱ्याकडे दाखवता, पण तीन बोट आपल्याकडे असतात याचं भान ठेवलं पाहिजे, असं कदम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती, या टीकेला देखील कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आज एक वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेना-भाजपमध्ये फूट पडली आहे, असे एक वातावरण तयार करायचं आहे, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र या अधिवेशनामध्ये दिसून आलं, कोण कोणासोबत होतं. मागच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता, हे कोणीही नाकारू शकत नाही. महाराष्ट्रात महायुतीला जे यश मिळालं, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा होता. आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे मंत्री काम करत आहोत, असं यावेळी योगेश कदम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, या व्हिडीओवर देखील योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे, हा व्हिडीओ मी अजून पाहिला नाही, व्हिडीओ पाहिल्यावर बोलू असं कदम यांनी म्हटलं आहे.
