मोठी बातमी! शिंदेंच्या खास शिलेदाराकडून उद्धव ठाकरेंना जेवणाचं निमंत्रण, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांना शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्याकडून जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना जेवणाचं निमंत्रण दिलं आहे. मैत्री जपायची असते, राजकारणात उद्या काय होईल सांगता येत नसतं, अशी प्रतिक्रिया सरनाईक यांनी यावर दिली आहे. तर दुसरीकडे मित्र म्हणून आमंत्रण स्वीकारावं लागतं अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले प्रताप सरनाईक?
राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही, राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, तसाच कोणी कोणाचा कायमचा मित्र देखील नसतो. त्यामुळे उद्या काय होईल हे मी तरी सांगू शकणार नाही. मला तर असं वाटतं देवाला सुद्धा या पृथ्वीतलावर राजकारणात काय होईल? हे सांगता येणार नाही, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. दरम्यान तुम्ही विरोधी पक्षात कोणा-कोणाला आमंत्रण द्याल असा प्रश्नही यावेळी सरनाईक यांना विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की मी सर्वांनाच निमंत्रण देईल, पक्षाच्या नेत्यापासून ते युवराजापर्यंत आणि विरोधी पक्षनेत्यांपर्यंत मी आमंत्रण देईल असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जेवणाचं निमंत्रण दिल्यानंतर आता यावर शिवसेना ठाकरे गटाकडून देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘मंत्री आमदार हे एकमेकांना जेवायला बोलावतात, आमचे राजकीय मतभेद आहेत. मी वाटेल तेवढी टीका त्यांच्यावर करतो, पण तो सिद्धात आहे. पण त्यापलीकडे माणूस म्हणून त्यांनी बोलावलं. शेवटी मित्रता ही कायम असते, जर मित्र म्हणून एखाद्यानं निमंत्रण दिलं तर ते स्वीकारावं लागतं, असं सुनील प्रभू यांनी म्हटलं आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली होती. शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. त्यावेळी अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. प्रताप सरनाईक यांनी देखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला.
