मटण खा त्यांचं, पण बटण दाबा आमचं… शिंदेंच्या मंत्र्याच्या विधानाची राज्यभरात चर्चा!
Gulabrao Patil : शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज प्रचारासाठी नाशिकमधील भगूर येथे आले होते. यावेळी बोलताना पाटील यांनी मतदारांना एक अजब सल्ला दिला आहे.

राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषदेच्या प्रचाराला वेग आला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात व्यस्त आहेत. शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज प्रचारासाठी नाशिकमधील भगूर येथे आले होते. यावेळी बोलताना पाटील यांनी मतदारांना एक अजब सल्ला दिला आहे. विरोधकांच मटण खा आणि बटण आमचं दाबा असं पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्द्यांवर प्रकाश टाकूयात.
ही निवडणूक शहर विकासाची आहे
गुलाबराव पाटील यांनी भगूरमध्ये बोलताना म्हटले की, भगूर नगरपालिकेत करंजकरांनी खूप काम केलं आहे. विरोधक कितीही एकत्र झाले तरीही जनता प्रतिमा, कामाला पाहून मतदान करेल. ही निवडणूक शहर विकासाची आहे. आधी बायको नव्याऱ्याकडे पैसे मागायची आता नवरा बायको कडे पैसे मागतो. अर्ध्या रात्री रक्त देणारी माणसे तुमच्या समोर उभी केली आहेत त्यांना साथ द्या.
मटण त्यांचे खा…
निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी मटणाचा बेत केला जातो. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘आता ते मटण देतील, मटण त्यांचे खा बटन आपले दाबा. कुणाचा बँड वाजवायचा आहे लोकांनी ठरवले आहे. त्यांच्याकडे फक्त पैसा आहे. विधानसभा निवडणूक आधी लक्ष्मी आली. आताही तुम्हाला लक्ष्मी मिळेल तुम्ही घराबाहेर झोपा. आता ते भांडण लावतील मुसलमान बांधवाना सांगतील शिवसेना वाले हाबु आहे. शिवसेना कधी जात पात बघत नाही.
आम्ही निवडून आलो आणि मंत्रीही झालो
पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, ‘मी मतदारसंघात बौद्ध विहाराची कामे केली, सर्व समाजासाठी कामे केली, शिंदे साहेबांनी 350 कोटी रुपये मतदारसंघात दिले. तिकडे मुंडकं भाजपचे, हात राष्ट्रवादीचे कमर उबाठाचे, पाय मनसेचे. आपल्याकडे एक सरळ आहे, सरसकट शिवसेना आहे. रात्री 4 वाजेपर्यंत सरकारचे काम करणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे आहे. आम्हाला तर गद्दार, खोके काय-काय ऐकावे लागले. हे निवडून येणार नाही असे म्हणत होते, पण आम्ही निवडून आलो आणि मंत्रीही झालो.
या सभेनंतर महायुतीवर बोलताना पाटील म्हणाले की, ‘पॉलिसी शिंदे साहेब ठरवतात, आम्ही आदेशावर चालणारे लोक आहोत. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, शिवसेना आपल्या पद्धतीने लढते आहे. प्रचारात आम्ही कुठेही टीका केली नाही, ते टीका करतील तर आम्ही टीका करणार नाही.’
