“मला या देशाची आता भीती वाटते…” संजय राऊत असं का म्हणाले?
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर १२ दिवस उलटूनही भारताकडून पुरेसे प्रतिशोध नाही, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यांनी सरकारच्या कारवाईला "नाड्या आवळणे आणि सोडणे" असे संबोधले आणि पाकिस्तानविरुद्धच्या कृतींना खरा बदला म्हणता येणार नाही, असे म्हटले आहे.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी २२ एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे. पहलगाम हल्ल्याला १२ दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप या हल्ल्याला भारताकडून कोणत्याही प्रकारचे चोख प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. आता यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत टीका केली आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल भाष्य केले. १२ दिवस झाले तरी हे बदला घेतात. आता युद्ध सराव करत आहेत. याला बदला म्हणतात का?? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता?
“पहलगाम हल्ल्याला १२ दिवस होऊन गेले आहेत. याचा बदला काय घेतला, या नाड्या आवळल्या, त्या नाड्या सोडल्या, पाकिस्तानचे २१ युट्यूब चॅनल बंद केले. पाकिस्तानच्या हायकमिशनमधील कर्मचारी वर्ग कमी केला, याला बदला घेणं म्हणतात का? तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता? त्यांचे पक्ष फोडून टाकता, त्यांना तुरुंगात टाकता. त्यांचं आयुष्य उद्धवस्त करता, त्यांच्या कुटुंबाचा छळ करता. बदला घेता ना, आपल्यासमोर आपला कोणताही राजकीय शत्रू नको. संपवून टाकायचं. मग पाकिस्तानच्या बाबतीत एअरस्पेस बंद केली, युट्यूब चॅनल बंद केलं, याला बदला घेणं म्हणतात का??” असा संतप्त सवाल संजय राऊतांनी व्यक्त केला.
मला या देशाची आता भीती वाटते
“२७ लोक मारले गेल्यावर बदला कसा असायला हवा. इंदिरा गांधींचा इतिहास पाहा. त्यांना नेहरु इंदिरा गांधींचा त्रास होतो. बदला म्हणजे कोणता बदला घेतला, कोणाला मूर्ख बनवताय, पंतप्रधान इथून तिथून लोकांना मिठ्या मारत फिरतात, लोकांना मुर्ख बनवतात. काहीही बदला घेतलेला नाही. शांतपणे आनंदात, सुखाने चाललं आहे. मला या देशाची आता भीती वाटते”, असेही संजय राऊत म्हणाले.
याला बदला म्हणतात का?
“हे अशाप्रकारचे राज्यकर्ते जर देशात असतील आणि शत्रू जर इतका समोर माजलेला असेल तर आमची बदल्याची पद्धत काय तर युट्यूब बंद करायचं आणि नाड्या आवळायच्या हे बंद करा. हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुन चुन के मारण्याचा प्रयत्न करतात. तेही आता शक्य नाही. १२ दिवस झाले तरी हे बदला घेतात. आता युद्ध सराव करत आहेत. याला बदला म्हणतात का??” असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
