मैत्रिणींसोबत घरात शिरली, काकूंचे दागिने ओरबाडले, आरडाओरड होताच केलं असं काही… परिसरात खळबळ
बोल्हेगाव परिसरात ४० वर्षीय मनीषा शिंदे यांची सोन्याच्या दागिन्यांसाठी निर्घृण हत्या करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने दोन अल्पवयीन मुलींसह चार जणींच्या टोळीला अटक करून या प्रकरणाचा छडा लावला. लालसेपोटी हा क्रूर गुन्हा घडल्याचे उघड झाले आहे.

दागिन्यांच्या लालसेपोटी एका ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमधील बोल्हेगाव परिसरात घडली आहे. या गुन्ह्यात दोन अल्पवयीन मुलींसह चार जणींच्या टोळीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या चौघींना अटक करून संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे. ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
अहिल्यानगर या ठिकाणीच्या बोल्हेगाव येथे राहणाऱ्या मनीषा शिंदे (४०) यांचा त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. यानंतर अत्यंत कमी वेळात या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद केले.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. मनीषा शिंदे यांचा खून एखाद्या सराईत गुन्हेगाराने नव्हे, तर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या युवतीने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले. या खुनाचा मुख्य सूत्रधार दिव्या अंकुश देशमुख ऊर्फ दिव्या विजय खाडे (२०) ही तरुणी असल्याचे उघड झाले आहे. दिव्याचे माहेर मयत मनीषा शिंदे यांच्या घराशेजारीच आहे. मनीषा शिंदे यांच्याजवळ सोन्याचे दागिने आहेत, याची दिव्याला माहिती होती. याच माहितीच्या आधारे तिने चोरीचा कट रचला.
हा कट रचल्यानंतर दिव्या खाडे हिने तिची साथीदार अंजुम सैफी आणि दोन अल्पवयीन मुलींना सोबत घेतले. चोरीच्या उद्देशाने या चौघींनी मनीषा शिंदे यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिने बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मनीषा शिंदे यांनी जोरदार आरडाओरड करण्यास सुरुवात केली. पण आपण पकडले जाऊ या भीतीने या चौघींनी ब्लेडने मनीषा शिंदे यांच्या गळ्यावर वार केले. यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला.
नागरिकांमध्ये मोठी चिंता
मनीष यांचा खून केल्यानंतर त्यांनी दागिने घेऊन तिथून पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे तपास करत या चौघींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी दागिन्यांच्या लालसेपोटी मनीषा शिंदे यांचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणात दिव्या खाडे, अंजुम सैफी आणि दोन अल्पवयीन मुलींना अटक केली आहे. या घटनेमुळे, विशेषतः अल्पवयीन मुलींचा सहभाग असल्याने, परिसरातील पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे.
