तिसरं लग्न, पत्नीला धमकी.. महिला आयोग आताही गप्प बसणार? इम्तियाज जलील यांचा सिद्धांत शिरसाट प्रकरणावर सवाल
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर विवाहीत महिलेने गंभीर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आता माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांतवर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले आहेत. सिद्धांतने फसवणूक करुन, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करत महिलेच्या वकीलांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणावरून माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांतवर आरोप करणाऱ्या महिलेचे नाव जान्हवी सिद्धांत शिरसाट असे आहे. जान्हवी ही सिद्धांतची पत्नी होती. तिचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दावा केला आहे की जान्हवीला नांदवायला त्यांनी नकार दिला. तिने छत्रपती संभाजी नगरला येण्याचा आग्रह केला, पण तिला येऊ दिलं नाही. तिला मुंबईत रहायला सांगितलं. आता प्रकरणावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया देत महिला आयोगाला देखील सवाल केला आहे. वाचा: ज्योती मल्होत्रानंतर CRPF जवानाचा खरा चेहरा समोर, थेट पाकिस्तानला पाठवले भारताचे…
काय म्हणाले इम्तियाज जलील?
माजी खासदार इम्तियाज जलील या प्रकरणावर प्रतिक्रिया देत म्हणाले की, दुर्दैव याचे वाटते की, एका मंत्राच्या मुलाने तिसरे लग्न केले आणि ज्या मुलीशी लग्न केले त्या मुलीला आता धमकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वकिलांनी त्या मुलाला नोटीस पाठवलेली आहे. मग सगळे लोक गप्प का बसले आहेत? आम्ही असं केलं असतं तर अख्खा मीडिया घरासमोर जमला असता. महिला आयोगाला आम्ही विनंती करणार आहे की, तुम्ही आताही गप्प बसणार आहात का? रुपाली चाकणकर ताईंना आम्ही हात जोडून विनंती करत आहोत की, ताई ती मुलगी मुंबईमध्येच राहते. तिला जाऊन भेटा आणि तिला न्याय मिळवून द्या.
काय आहे नेमकं प्रकरण?
सिद्धांत शिरसाटने कुटुंबीयांसमोर रितीरिजावानुसार जान्हवीशी लग्न केले. दोन वर्षे त्यांचा संसार खूप चांगला सुरु होता. पण काही दिवसांनंतर सिद्धांतचे तिसऱ्या मुलीशी प्रेम प्रकरण सुरु झालं. त्यामुळे त्याने जान्हवीचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. तिच्याकडे दुर्लक्ष केले. तिला कधीही संभाजी नगरला येऊ दिले नाही. संभाजी नगरला आलीस, तर तंगडं तोडू अशी धमकी दिली. जान्हवीच्या वकिलांनी सिद्धांतला नोटीस पाठवली. त्यात त्यांनी सात दिवसांच्या आत जान्हवीला नांदवण्यासाठी घेऊन जा अन्यथा हिला अत्याचार कायद्यासह तीन केसेस दाखल करु असे वकील चंद्रकांत म्हणाले.
