सावधान रिल्स करताय, मग ही बातमी तुमच्यासाठी, कल्याणमध्ये एका रिलमुळे तरुण पोहोचला जेलमध्ये
कल्याणमधील एका तरुणाने सोशल मीडियावर रिल्ससाठी पोलिसांचा गणवेश आणि बनावटीचा कट्टा वापरला. त्याने हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला, ज्यामुळे पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्याकडून पोलिसांचे गणवेश आणि कट्टा जप्त केला.

हल्ली सोशल मीडियावर रिल्स व्हिडीओ बनवण्याचे प्रमाण वाढले आहे. रिल्स बनवण्यासाठी काही जण काहीही करायला तयार असतात. मात्र हेच रिल्स बनवणं आता तुम्हाला महागात पडू शकते. सोशल मीडियावर रिल्स बनवण्याच्या नादात अनेक जण कायद्याचे उल्लंघन करताना दिसत आहेत. अशीच एक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. कल्याणमध्ये एका तरुणाला पोलिसांचा गणवेश परिधान करून हातात गावठी कट्टा घेऊन फोटो पोस्ट करणे चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
कल्याणमधील मिलिंदनगर परिसरातील गौरीपाडा या ठिकाणी सनीकुमार विजय पाल उर्फ चौहान हा १९ वर्षीय तरुण राहतो. त्याला रिल्स बनवण्याचा प्रचंड शौक आहे. तो कायमच विविध रिल्स बनवत असतो. त्यातच ३ जुलै रोजी सनीकुमारला रिल बनवण्याचे होते, त्यासाठी तो पोलिसाचा गणवेश करणार आहे, त्याच्याकडे पिस्तूल आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर कल्याणमध्ये खडकपाडा पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एक सापळा रचला.
या ठिकाणी पोलिसांनी संशयास्पद हालचाल करणाऱ्या सनीकुमारला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता तिथे पोलिसांचे दोन गणवेश, एक स्टार नेमप्लेट आणि इतर संबंधित साहित्य आढळून आले. आश्चर्याची बाब म्हणजे, आरोपी सनीकुमारने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोलिसाचा गणवेश परिधान केलेला आणि हातात गावठी कट्टा घेतलेला एक फोटो पोस्ट केला होता. या पोस्टनंतर पोलिसांना तपासाची नवी दिशा मिळाली. या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला.
अधिक तपास सुरू
यानंतर पोलिसांनी सनीकुमारला ताब्यात घेतले असून, त्याने आतापर्यंत असे किती गुन्हे केले आहेत, ही बंदूक त्याला कुठून मिळाली आणि पोलिसांची वर्दी वापरून त्याने कोणाची फसवणूक केली आहे का, याबाबत अधिक तपास सुरू आहे. मात्र अद्याप याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.