अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठा पेच, अंतर्गत विरोधामुळेच मोठं संकट; 2 माजी नगरसेवकांचं काय होणार?

Solapur Municipal Corporation Election : सोलापूर मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले होते. मात्र आता ते पुन्हा पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत, मात्र याला इतर नेत्यांचा विरोध पहायला मिळत आहे.

अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठा पेच, अंतर्गत विरोधामुळेच मोठं संकट; 2 माजी नगरसेवकांचं काय होणार?
Ajit Pawar Solapur
Image Credit source: Google
| Updated on: Dec 29, 2025 | 4:50 PM

राज्यात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 16 तारखेला मतमोजणी होणार आहे. सध्या अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळालेले नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. सोलापूर मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले होते. राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष, माजी मनपा गटनेते किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा भाजपत प्रवेश केला होता. मात्र आता हे दोघेही राष्ट्रवादीत घरवापसी करण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांना पक्षात परत घेण्यास इतर नेत्यांचा विरोध असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दोन माजी नगरसेवक राष्ट्रवादीत घरवापसी करणार

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजपत प्रवेश केला होता. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला होता. मात्र आता हे दोन माजी नगरसेवक पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत. मात्र या घरवापसीला राष्ट्रवादीचे सोलापूरचे शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी तीव्र विरोध केला आहे.

संतोष पवार आणि जुबेर बागवान यांचा विरोध

किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या पक्षप्रवेशाला सोलापूरचे शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांचा विरोध आहे. या दोघांना पक्षात घेतल्यास आम्ही पदाचा राजीनामा देणार असल्याचे या नेत्यांनी म्हटले आहे. मात्र कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून या दोघांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास पक्षाची ताकद वाढणार आहे. त्यामुळे दत्तात्रय भरणे हे सोलापूरमध्ये ठाण मांडून बसले आहेत. या दोन्ही माजी नगरसेवकांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास पक्षाला आगामी निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान हे या दोघांना पक्षात प्रवेश देतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.