असं वाटतं या देशात मुस्लिमांना राहण्याचा अधिकार नाही, अबू आझमी संतापले
मुस्लिमही या देशातील लोक आहेत. त्यांच्यावर वारंवार अन्याय केला जातोय. हे देशासाठी बरोबर नाही, असं यावेळी सपा नेते अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. असं वाटतंय की या देशात मुस्लिम लोकांना राहण्याचा अधिकारी नाही. चारही बाजूने मुस्लिमांना घेरलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले आझमी?
असं वाटतंय की या देशात मुस्लिम लोकांना राहण्याचा अधिकारी नाही. चारही बाजूने मुस्लिमांना घेरलं जात आहे, आमच्याकडे कुरेशी समुदाय आहे. तो मटन विक्रीचं काम करतो, ते लोक ९५च्या दुरुस्तीनुसार शेतकऱ्यांच्या जत्रेतून जनावरे खरीदी करतात. पण एखाद्या मुस्लिमाने गाय खरेदी केली तर गाय तर दुधासाठीही खरेदी केली जाऊ शकते. बैल शेतीसाठीही खरेदी केला जाऊ शकतो. असं नाही की मुस्लिम खरेदी करत आहे म्हणजे तो हत्येसाठीच खरेदी करतोय असं नाही. गाईची हत्या करण्यासाठी खरेदी करत असेल तर कठोर कायदा बनवा. फाशी द्या. पुन्हा असं कोणी करू नये, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, पण जेव्हा मुस्लिम खरेदी करतो तेव्हा काही कट्टरपंथी ज्यांची मी नावं घेणार नाही, कारण मला जीवे मारण्याची धमकी येते. आमचं नाव घेण्याची तुझी लायकी काय असं म्हणतात. ते कोण लोकं आहेत हे तुम्हाला माहीत आहे. ते जनावरांना रोखतात. आणि लोकांना मारतात. हे जनावर ते गोशाळेत ठेवतात. दोन दिवसानंतर गोशाळेतून जनावरे गायब होतातय. म्हैस नेली तरी मारतात. मी गेल्या ११ तारखेची घटना सांगतो. ठाण्यातील कत्तलखान्यातून मटन बाहेर आलं. साडे सात लाखाचं मटन होतं. डॉक्टरांचं सर्टिफिकेट होतं. काशिमीरामध्ये जाताच गाडी थांबवली आणि ड्रायव्हरला मारलं. म्हशीचं मटन असल्याचं सांगितलं तरी ऐकलं नाही. काशिमीरा पोलिसात नेलं. पोलिसांनी डॉक्टर बोलावले. डॉक्टरांनी मटन चेक करून ते म्हशीचं असल्याचं सांगितलं. त्यानंतरही या लोकांना मारहाण करण्यात आली. कोर्टात नेलं. कोर्टाने मटन फेकायला सांगितलं. पोलिसांनी त्याची व्हॅल्यू साडे तीन लाख ठेवली. पण ती किंमत साडे सात लाख आहे, असं आझमी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान देशात काय कायदा आहे? कुरेशी समाजासोबत हे घडत आहे. त्यांचा व्यवसाय तो आहे. कुरेशी समाजाने जनावरं विकत न घेण्याचं आणि मटन न विकण्याचं ठरवलं आहे. ते संपावर जात आहेत. मुस्लिमही या देशातील लोक आहेत. त्यांच्यावर वारंवार अन्याय केला जातोय. हे देशासाठी बरोबर नाही. गोव्यात आणि नॉर्थ ईस्टमध्ये गायींची कत्तल का होते? तिथे हिंदू नाही का?, असा सावलही यावेळी आझमी यांनी केला आहे.
