मोठी बातमी! बँकेत मोठा राडा, सदावर्ते आणि शिंदे गटात हाणामारी, नेमकं प्रकरण काय?
Shivsena vs Sadavatre: एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा राडा झाला आहे. शिवसेना शिंदे गट आणि सदावर्ते गट यांच्यात हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. या बैठकीत अपमानास्पद भाषा वापरल्याने आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ही हाणामारी झाल्याचे समोर आले आहे.

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा राडा झाला आहे. शिवसेना शिंदे गट आणि सदावर्ते गट यांच्यात हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. या बैठकीत अपमानास्पद भाषा वापरल्याने आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ही हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आता नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
संचालक मंडळाच्या बैठकीत राडा
या हाणामारीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, यात एक संचालक उभा राहून बोलत असल्याचे दिसत आहे. तो म्हणत आहे की, ‘ही संचालक मंडळाची बैठक आहे. याचे कोणीही रेकॉर्डिंग करू नये, याचा आऊटपूट बाहेर जाता कामा नये, असं वर्तन कुणीही करू नये.’ मात्र यानंतर बैठकीत राडा सुरु होतो, संचालक एकमेकांकडे हातवारे करून भांडू लागतात. तसेच एकमेकांवर बाटल्या आणि इतर वस्तू फेकतात. या घटनेत एकनाथ शिंदे-आनंदराव अडसूळ संघटनेचे 4-5 संचालक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन्ही गट पोलीस ठाण्यात
समोर आलेल्या माहितीनुसार आज सकाळी एसटी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक सुरु होती. या बैठकीला सदावर्ते यांच्या पॅनलचे सर्व संचालक आणि शिवसेना अडसूळ पॅनलचे संचालकही उपस्थित होते. सदावर्ते यांच्या संचालकांनी आमच्या महिला कर्मचाऱ्यांसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप केला. त्यानंतर मारहाण सुरु झाली. यानंतर मोठा राडा झाला. या राड्यानंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात गेले. पोलीसांकडून दोन्ही गटांची तक्रार घेण्याचे काम सुरु आहे.
संचालकांकडून महिलांचा अपमान होत असल्याचा आरोप
या घटनेबाबत एका संचालकाने सांगितले की, आज कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी काही विरोधी संचालकांनी आमच्या महिलांचा अपमान केला. महिलांचे कपडे फाडण्यात आले, मंगळसूत्र तोडण्यात आले, जातीवाचक शिवीगाळ केली, त्यामुळे हा वाद निर्माण झाला. वारंवार त्या संचालकांकडून महिलांचा अपमान होत आहे. त्यामुळे राडा झाला. या प्रकरणाची फिर्याद देण्यासाठी आम्ही पोलीस ठाण्यात आलो आहोत.
