पुण्याच्या जमीन घोटाळ्याचा अहवाल आला, धक्कादायक माहिती समोर; पार्थ पवारांना थेट…
पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना क्लीनचीट देण्यात आलेली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Pune Land Scam : गेल्या काही दिवसांपासून कथित पुणे जमीन घोटाळा महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या कथित जमीन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपत्र पार्थ पवार यांचे नाव आले आहे. त्यामुळेच अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. सोबतच या प्रकरणात जो कोणी दोषी आढळले, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. असे असतानाच आता मोठी माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना क्लीनचीट देण्यात आलेली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नेमकी काय माहिती समोर आली?
मिळालेल्या माहितीनुसार मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुद्रांक विभागाचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या तिघांवरही अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. परंतु या अहवालात पार्थ पवार यांचे नाव नाही. पार्थ पवार यांचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळेच आता पार्थ पवार यांना क्लीनचीट मिळालेली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राजेंद्र मुठे यांच्या नेतृत्त्वाखाली या प्रकरणाची तपासणी करण्यात आली होती. आता हा अहवाल सादर करण्यात आला आहे.
तीन समित्यांकडून चौकशी, मुठे समितीच्या अहवालात काय आहे?
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने मुठे समिती स्थापन केली होती. सरकारने तशा एकूण तीन समित्या स्थापन केल्या होत्या. मुठे समितीला सात दिवसांच्या आत या प्रकरणाचा अहवाल सादर करावा, असा आदेश देण्यात आला होता. आज हा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला. याच अहवालात पार्थ पवार यांचे नाव नाही. जमीन व्यवहारासाठी करण्यात आलेल्या खरेदी खतामध्ये पार्थ पवार यांचा कुठेही उल्लेख नाही, असे या अहवालात म्हटलेले आहे. त्यामुळेच पार्थ पवार यांना क्लीनचीट मिळालेली आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे. याआधी या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पार्थ पवार यांच्याविरोधात अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
नेमकं प्रकरण काय आहे?
मुंढव्याचा जमीन व्यवहार हा बिल्डर शीतल तेजवानी आणि पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीमध्ये झाला होता. मात्र हा व्यवहार पुढे वादात अडकला. या व्यवहारात जवळपास 300 कोटी रुपयांना जमीन खरेदी करण्याचे ठरले होते. व्यवहार झालेला असला तरी त्याची स्टँम्प ड्युटी भरण्यात आलेली नव्हती. त्यानंतर हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. हे प्रकरण तापल्यानंतर राज्य सरकार आणि महसुल विभागाकडून या प्रकरणाची चौकशीचे आदेश देण्यात आले होते.
