Sunil Tatkare : सुनेत्रा पवारांच्या शपथविधी विषयी काहीच माहित नाही, या शरद पवारांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचं उत्तर काय?
Sunil Tatkare : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती. याविषयीचा निर्णय 12 तारखेलाच जाहीर होणार होता असा गौप्यस्फोट शरद पवारांनी आज केला. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी सुरु आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांचं तीन दिवसांपूर्वी विमान अपघाततात अकाली निधन झालं. त्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. अजित पवार संभाळत असलेली उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोण संभाळणार? राजकीय पक्ष पुढे कोण चालवणार? असे अनेक प्रश्न होते. त्या दृष्टीने आता राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्याआधी आज सकाळी शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्यात बोलताना शरद पवार यांनी काही महत्वाच्या गोष्टींचा उलगडा केला.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती. याविषयीचा निर्णय 12 तारखेलाच जाहीर होणार होता असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. त्याशिवाय सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीविषयी आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत सुरु असलेल्या घडामोडींविषयी पत्रकरांनी संवाद साधला.
तो निर्णय मुख्यमंत्र्यांना कळवू
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरु होती, त्या बद्दल काय सांगाल? त्यावर सुनील तटकरे म्हणाले की, “मला या विषयावर आता काही बोलायचं नाही. आज विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. या विषयावर नंतर बोलता येईल” सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी विषयी शरद पवारांना माहिती नाही. यावर तटकरेंनी सांगितलं की, “एकतर विधिमंडळ पक्षाची बैठक दुपारी आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत जो काही निर्णय होईल, तो पक्षाचे वरिष्ठ नेते या नात्याने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवू” असं उत्तर दिलं.
