‘अहंकारी आणि अज्ञानी’, अविमुक्तेश्वरानंद यांच्या वादावर ममता कुलकर्णींचा थेट हल्ला
अहंकारी की अज्ञानी, अविमुक्तेश्वरानंद यांच्या वादावर अखेर ममता कुलकर्णी यांनी मौन सोडलं आहे. नेमकं काय म्हटलं?

Mamta Kulkarni : प्रयागराज येथे सुरू असलेला माघ मेळा यंदा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वापुरताच मर्यादित न राहता, विविध वादग्रस्त घटनांमुळे सातत्याने चर्चेत आहे. साधू-संतांचे आचरण, परंपरा, अधिकार आणि प्रशासनाच्या निर्णयांवरून सुरू असलेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर आता किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर ममता कुलकर्णी यांचे नावही चर्चेत आले आहे.
माघ मेळ्यात अनुपस्थित राहिल्याबाबत पसरलेल्या चर्चांवर अखेर ममता कुलकर्णी यांनी मौन सोडले असून, त्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. तसेच, ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या धरना-प्रकरणावर त्यांनी अत्यंत कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
माघ मेळ्यात सहभागी न होण्याबाबत बोलताना ममता कुलकर्णी म्हणाल्या की, ‘माझे आयुष्य आता पूर्णपणे साधना आणि तपश्चर्येला समर्पित आहे. मी गेल्या 25 वर्षांपासून सातत्याने तप करत आहे. रोज गंगाजलाने स्नान केल्यानंतरच पूजा-पाठ करते. सध्या गुप्त नवरात्र सुरू असल्याने या काळात मी कुठेही बाहेर जात नाही. त्यामुळेच यंदा माघ मेळ्यात उपस्थित राहू शकले नाही.’ त्यांनी स्पष्ट केले की, ही अनुपस्थिती कोणत्याही वादामुळे नसून पूर्णपणे धार्मिक आणि वैयक्तिक साधनेशी संबंधित आहे.
एका मुलाखतीदरम्यान, माघ मेळ्यात पालकी रोखल्याच्या निषेधार्थ शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केलेल्या धरन्याबाबत विचारले असता, ममता कुलकर्णी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, ‘या संपूर्ण प्रकरणात शंकराचार्यांच्या निर्णयामुळे त्यांच्या शिष्यांचे मोठे नुकसान झाले. जर स्नान करायचेच होते, तर पालकीतून उतरून पायीही संगमापर्यंत जाता आले असते. गुरु होण्याचा अर्थ जबाबदारी आणि संयम असतो, हट्ट नव्हे. अशा हट्टाची किंमत शिष्यांना मोजावी लागली असं त्यांनी म्हटलं आहे.
‘कायदा सर्वांसाठी समान’
ममता कुलकर्णी यांनी पुढे सांगितले की, कायदा सर्वांसाठी समान असतो. राजा असो वा सामान्य माणूस, गुरु असो वा शिष्य कायदा सगळ्यांसाठी एकसारखाच आहे. केवळ चारही वेद पाठ असल्याने कोणी शंकराचार्य होत नाही. त्यांच्या मते, या संपूर्ण वादात अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा अहंकार स्पष्टपणे दिसून येतो आणि आत्मज्ञानाचा अभाव जाणवतो असं त्यांनी म्हटलं.
नेमके काय घडले होते?
18 जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती सुमारे 200 शिष्यांसह पालकीत बसून संगम स्नानासाठी निघाले होते. मात्र, संगम परिसरात प्रचंड गर्दी असल्याने मेला प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव पालकीसह पुढे जाण्यास मनाई केली आणि पायी जाऊन स्नान करण्याचा सल्ला दिला.
प्रशासनाचे म्हणणे होते की, पालकीसह पुढे गेल्यास चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, शंकराचार्य पालकीतूनच संगमात जाण्यावर ठाम राहिल्याने प्रशासन आणि त्यांच्या समर्थकांमध्ये सुमारे तीन तास तणावपूर्ण चर्चा झाली ज्यामुळे माघ मेळ्यातील वातावरण अधिक तापले.
