वांगणीतल्या अंध कामगारांचंही ‘वर्क फ्रॉम होम’, घरबसल्या कामांतून पैसे मिळविण्याचा प्रयत्न

कोरोनामुळे बदललेल्या जीवनशैलीत अटळ ठरलेली वर्क फ्रॉम संस्कृती आता अंध कामगारांनीही स्वीकारली आहे (blind workers also tried to get money from work from home).

वांगणीतल्या अंध कामगारांचंही ‘वर्क फ्रॉम होम', घरबसल्या कामांतून पैसे मिळविण्याचा प्रयत्न
वांगणीतल्या अंध कामगारांचंही ‘वर्क फ्रॉम होम', घरबसल्या कामांतून पैसे मिळविण्याचा प्रयत्न

अंबरनाथ (ठाणे) : कोरोनामुळे बदललेल्या जीवनशैलीत अटळ ठरलेली वर्क फ्रॉम संस्कृती आता अंध कामगारांनीही स्वीकारली आहे. वांगणीत आपल्या घरी बसून ही मंडळी स्वयंसेवी संस्थांकडून मिळणारी कामं करतायत. सध्या जॉय स्कील क्राफ्ट या संस्थेनं त्यांना केकचे खोके बनविण्याचं काम दिलं असून अशाच प्रकारची अन्य कामंही मिळावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे (blind workers also tried to get money from work from home).

वांगणी गावात अंध कुटुंबियांची सर्वात मोठी वस्ती

लोकलमध्ये छोट्या-मोठ्या वस्तू विकून जेमतेम आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अंध बांधवांवर कोरोनामुळे मोठं संकट कोसळलं. ठाणे जिल्ह्यातील वांगणी गावात अंध कुटुंबियांची सर्वात मोठी वस्ती आहे. ग्रामपंचायतीकडे असलेल्या नोंदीनुसार इथे 250 अंध कुटुंब राहतात. जॉय स्क्रील क्राफ्ट ही संस्था गेली काही वर्ष या अंध कामगारांना मेणबत्या तसेच कागदी पिशव्या बनविण्याचे काम देते (blind workers also tried to get money from work from home).

तीन महिन्यांपासून अंध महिला आणि पुरूषांना घरोघरी काम

वांगणीत एक बंगला भाड्याने घेऊन तिथे हे काम होत होतं. मात्र संचारबंदीच्या काळात कामं कमी झाल्यानं संस्थेला बंगल्याचं भाडं देणं परवडत नव्हतं. त्यामुळे आता गेल्या तीन महिन्यांपासून अंध महिला आणि पुरूषांना घरोघरी काम दिलं जातं. केकचे 6 हजार खोके बनविण्याचं काम सध्या त्यांच्याकडे आहे. वांगणीतील 10 ते 12 घरांमध्ये सध्या ही कामं सुरू आहेत. मात्र हे काम संपल्यावर पुढे काय? असा प्रश्र त्यांना पडलाय.

‘आम्हाला कामाची गरज’

गेल्या वर्षभरात अनेक संस्थांनी वांगणीतल्या अंध बांधवांना अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू दिल्या. मात्र या अंध बांधवांना कामाची खरी गरज आहे. आम्ही सगळे इथं भाड्याने राहतो, 2 हजार रूपये घरभाडं, लाईट बिल भरावं लागतं. तो खर्च भागविण्यासाठी आम्हाला पैशांची गरज असून त्यासाठी आम्हाला कामाची खरोखर गरज असल्याचं हे अंध बांधव सांगतात.

लसीकरण मोहिमेची आवश्यकता

या समस्येसोबतच अंध बांधवांना आणखी एक समस्या भेडसावतेय. ती म्हणजे लसीकरण. कारण वांगणी गावात राहणाऱ्या अंध बांधवांपैकी आत्तापर्यंत 10 टक्के लोकांनीही लस घेतलेली नाही. हे लोक रांगेत फार काळ उभे राहू शकत नसल्यानं त्यांच्यासाठी लसीकरणाची विशेष मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे.

अंबरनाथ तालुक्यात मोठा औद्योगिक विभाग आहे. त्यातून किरकोळ कामं मिळाली, तर या अंध कुटुंबाना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे आता या अंध बांधवांसाठी कुणीतरी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा : कोरोनाची दुसरी लाट आणि पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवाल?; वाचा खास टिप्स

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI