फी दरवाढीला विरोध अंगाशी, विद्यार्थ्याचा दाखला थेट पोस्टाने घरी, डोंबिवलीतील शाळेचा प्रताप

फी वाढ करु नका, अशी मागणी करणाऱ्या एका पालकाला शाळेने मोठा झटका दिला आहे. शाळेने संबंधित पालकाच्या मुलाचा दाखला थेट पोस्टाने घरी पाठवला आहे.

फी दरवाढीला विरोध अंगाशी, विद्यार्थ्याचा दाखला थेट पोस्टाने घरी, डोंबिवलीतील शाळेचा प्रताप
फी दरवाढीला विरोध अंगाशी, विद्यार्थ्याचा दाखला थेट पोस्टाने घरी, डोंबिवलीतील शाळेचा प्रताप

डोंबिवली (ठाणे) : कोरोना काळात अनेकांना कामधंदे नव्हते. काही जणांचा कसबसा कामधंदा सुरु झाला आहे. नागरीक हैराण आहेत. ते आपल्या मुलांच्या शाळेची भरमसाठ फी भरु शकत नाहीत. त्यामुळे फी वाढ करु नका, अशी मागणी करणाऱ्या एका पालकाला शाळेने मोठा झटका दिला आहे. संबंधित व्यक्ती हा पालकांचं नेतृत्व करत होता. त्यामुळे त्याला शाळेने शिक्षा दिली आहे. शाळेने संबंधित पालकाच्या मुलाला शाळेतून काढल्याचा दाखला थेट पोस्टाने घरी पाठविला आहे. विद्यार्थ्याने या घटनेचा धसका घेतला आहे. या संदर्भात लालचंद पाटील या पालकाने शिक्षणमंत्र्यांकडे शाळेची परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवलीच्या ग्रमीण भागात असलेल्या सोनारपाडा परिसरात शंकरा स्कूल आहे. या शाळेत काही दिवसांपूर्वी फी वाढविण्यात आली होती. कोरोना काळात पालकांकडे काम नव्हते. अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या. काही पालकांचा व्यवसाय बंद झाला. वाढीव फी देणार कशी? असा प्रश्न पालकांसमोर होता. लालचंद पाटील यांचा 13 वर्षाचा मुलगा सार्थक याच शाळेत शिकतो. लालचंद पाटील यांची परिस्थिती चांगली आहे. ते वाढीव फी कदाचित देऊ शकता. पण अन्य पालकांची परिस्थिती बेताची आहे.

लालचंद पाटील यांचा शाळेवर आरोप

लालचंद पाटलांनी सर्व पालकांच्या वतीने पुढाकार घेतला. फी कमी करण्यात यावी या संदर्भात शाळा प्रशासनास निवेदन दिले. इतकेच नाही तर वारंवार फी कमी करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे शाळा प्रशासनाने याचा राग काढला, असा आरोप लालचंद पाटील यांनी केला.

“माझ्या मुलाला शाळेतून काढून टाकल्याचा दाखला थेट घरी पोस्टाने पाठविला. जेव्हा माझा मुलगा फी भरण्यासाठी गेला. त्यादिवशी त्याला शाळेतील शिक्षिकेने सांगितले की, तुला शाळेतून काढण्यात आले आहे. तुझा दाखला घरी पाठविला आहे. हे ऐकून त्या मुलाला धक्काच बसला”, असं लालचंद पाटील यांनी सांगितलं. याप्रकरणी लालचंद पाटील यांनी शाळेची परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे.

पालकांची शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार

लालचंद पाटील यांनी शाळेच्या विरोधात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रार केली आहे. त्या लहान मुलगा सार्थकने धसका घेतला आहे. तो या शाळेत शिकण्यास तयार नाही, असं लालचंद म्हणाले. “या प्रकरणावर टिटवाळा एज्युकेशन ट्रस्टचे पदाधिकारी विजय देशेकर यांनी प्रतिक्रिया दिली. शाळेच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे. अशी घटना भविष्यात घडू नये, यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे”, असं विजय देशेकर म्हणाले.

शाळेकडून भूमिका स्पष्ट नाही

या संदर्भात शाळेची भूमिका जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी शाळेत गेले असता शाळेकडून सांगण्यात आले की, याविषयी कोणीही बोलण्यास उपलब्ध नाही. उद्या दुपारनंतर शाळेचे ट्रस्टी किंवा मुख्याध्यापक भेटणार आहेत. त्यामुळे शाळेची प्रतिक्रिया मिळू शकली नाही (Dombivali Shankara school send certificate of student being expelled from school through post).

संबंधित बातम्या :

मुजोर शाळांना वचपा बसणार कसा? राज्य सरकारकडून फी बाबत अद्यापही निर्णय नाही, आरटीआयमधून माहिती उघड

नवी मुंबईतील मुजोर शाळा, 300 विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित, फीसाठी थेट पालकांना शाळेच्या आवारात कोंडलं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI