ठाण्यात कोरोनामुळे अनाथ झालेल्या सहा विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने शैक्षणिक खर्च उचलला

कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या अनाथ मुलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक दायित्व म्हणून शैक्षणिक खर्च देण्याबाबतचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

ठाण्यात कोरोनामुळे अनाथ झालेल्या सहा विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने शैक्षणिक खर्च उचलला
ठाण्यात कोरोनामुळे अनाथ झालेल्या सहा विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने शैक्षणिक खर्च उचलला

ठाणे : कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या अनाथ मुलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक दायित्व म्हणून शैक्षणिक खर्च देण्याबाबतचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या विश्वस्त तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

राष्ट्रवादीची ‘राष्ट्रवादी जिवलग’ योजना

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाची योजना लागू केली आहे. कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांच्या देखभालीसाठी राष्ट्रवादीने ‘राष्ट्रवादी जिवलग’ योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासूनच ही योजना लागू केली करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

ठाण्यात सहा मुलांची जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार आणि ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील सहा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उचलला आहे. यावेळी या सर्व विद्यार्थ्यांशी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या विश्वस्त तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी संवाद साधला.

चिराग नगर, ठाणे येथील तन्यया रामचंद्र वाटाणे (वय 9 वर्षे) आणि कु. याशिका रामचंद्र वाटाणे (वय 2 वर्षे), चंदनवाडी येथील कु. कुशल किरण कांबळे (वय 14 वर्षे) आणि कु. किंजल किरण कांबळे, ओसवाल पार्क, माजिवाडा येथील कु. शैलेश राजे या अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहराने उचलला आहे. त्यानुसार पुजा शिंदे (विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस), श्रृती कोचरेकर (कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस), रविंद्र पालव (सरचिटणीस), भरत सावंत (ज्येष्ठ कार्यकर्ते), समीर पेंढारे (ब्लॉक अध्यक्ष), पल्लवी जगताप (युवती अध्यक्षा, ठाणे), अभिषेक पुसाळकर (विधानसभा अध्यक्ष युवक), नितीन पाटील (परिवहन समिती सदस्य) यांनी या सर्व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शैक्षणिक साहित्य व शैक्षणिक निधी प्रदान केला.

अनाथांसाठी ‘राष्ट्रवादी दूत’

या योजनेचा पहिला टप्पा एक वर्षाचा असून यासाठी पक्षातील प्रत्येकी एक सहकारी असे 450 जण या 450 कुटुंबांशी म्हणजे त्या अनाथ मुलांशी जोडले जाणार आहेत. यासाठी राष्ट्रवादीने ‘राष्ट्रवादी दूत’ निर्माण केले आहेत. यात अनाथ मुलींसाठी पक्षातील महिला, युवती तर मुलांसाठी युवक किंवा पुरुष कार्यकर्ते ‘राष्ट्रवादी दूत’ म्हणून काम पाहतील, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

घरोघरी जाऊन माहिती घेणार

‘राष्ट्रवादी दूत’ या 450 अनाथ मुलांच्या घरी जातील. या मुलांच्या काय गरजा आहेत, त्यांची अडचण समजून घेऊन ती माहिती पक्षाकडे देतील. शिवाय या अनाथ मुलांची माहिती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे. तो डाटाही जमा केला जाईल आणि यातून एक व्यापक कार्यक्रम व पारदर्शक कारभार केला जाणार आहे. शिवाय यांची इत्यंभूत माहिती पक्षाच्या वेबसाईटवर व स्वतः माझ्या पेजवर उपलब्ध राहील, असेही त्यांनी स्पष्ट केलं. या अनाथ मुलांच्या आयुष्यात आई-वडिलांची पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या ‘राष्ट्रवादी जीवलग’ या योजनेतून केले जाणार आहे.

हेही वाचा : कोरोना काळातील अनाथांसाठी राष्ट्रवादीची ‘राष्ट्रवादी जिवलग’ योजना; गुरुवारपासून योजनेला सुरुवात

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI