अजित पवारांच्या पक्षाला मोठा झटका, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये थेट भाजपात प्रवेश करणार योगेश क्षीरसागर?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना मोठ्या घडामोडी घडत आहेत. योगेश क्षीरसागर अजित पवारांच्या गटाची साथ सोडून कमळ हातात घेणार असल्याची तूफान चर्चा सुरू असून ते छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर असताना राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बीड जिल्ह्यात मोठी ताकद बघायला मिळते. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर अजित पवारांनी बीडचे पालकमंत्रिपद स्वत:कडे ठेवले. यासोबतच पक्षाला नवीन ताकद देण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे. धनंजय मुंडे यांच्यामुळे अजित पवार गटाचा बालेकिल्ला म्हणून परळीकडे बघितले जाते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर सर्वात मोठा झटका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसला असून योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा दिला असून पक्षाला राम राम केला. आता योगेश क्षीरसागर भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
काल राजीनामा दिल्यानंतर योगेश क्षीरसागर आता छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी काल राजीनामा दिला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षात स्थानिक पातळीवर कुठल्याच निर्णय प्रक्रियेत आपल्याला घेतले जात नसल्याची नाराजी व्यक्त केली. यानंतर ते छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते भाजपमध्ये आजच पक्षप्रवेश करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना योगेश क्षीरसागर यांनी म्हटले की, काल मी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मी केलेल्या कामाची दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे मी राजीनामा दिला आहे. विधानसभेला माझा पराभव झाल्यानंतर पक्षातीलच लोक खेळी करू लागले. याबाबतची पक्षश्रेष्ठींना मी वेळोवेळी माहिती दिली होती. परंतु दखल घेतली गेली नाही म्हणून मी काल राजीनामा दिला आहे. पुढील दिशा आणि निर्णय लवकरच आम्ही जाहीर करू.
विधानसभेची तयारी आम्ही दोन वर्षांपासून करत होतो. बीडची उमेदवारी देताना विधानसभेला विलंब करण्यात आला. परंतु पक्षाचे अनेकजण माझ्यासोबत नव्हते. निवडणूक जवळ आलेली असताना मला विचारणा होत नाही. पार्टीचं धोरण काय आहे हे कळत नव्हतं.पक्षातीलच माझ्या विरोधकांकडून हे सूत्र हालत होते. बीड नगरपालिका गेली 30-35 वर्ष.. आपण निकाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने लावलेली आहे. आता योगेश क्षीरसागर हाती कमळ घेत असल्याची चर्चा आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जातंय.
