मनसेच्या उमेदवाराला पोलिसाने एकनाथ शिंदेंच्या घरी नेलं अन् नंतर… अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप
Thane Election : राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीचे तब्बल 60 पेक्षा जास्त नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. आता महायुतीने दमदाटी करत आणि आर्थिक आमिष दाखवून विरोध उमेदवारांना माघारी घ्यायला लावल्याचा आरोप होत आहे.

मयुरेश जाधव, प्रतिनिधी : राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी भव्य सभांचे आयोजन केले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेत आपला महापौर बसला पाहिजे यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी सर्वस्व पणाला लावले आहे. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी महायुतीचे तब्बल 60 पेक्षा जास्त नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र आता बिनविरोध निवडणूक झालेल्या ठिकाणी महायुतीने दमदाटी करत आणि आर्थिक आमिष दाखवून विरोध उमेदवारांना माघारी घ्यायला लावल्याचा आरोप होत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
उमेदवारांना दमदाटी…
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दम देण्यात आल्याचा आरोप केला आहे. जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी मनसेच्या उमेदवाराला एक पोलिस अधिकारी घेऊन जात असल्याचा व्हिडिओ दाखवला आहे. तसेच शिंदे यांच्या घरी गेल्यानंतर हा उमेदवार अर्ज मागे घेतो असंही जाधव यांनी म्हटले आहे. विक्रांत घाग असे या उमेदवाराचं नाव असून या उमेदवाराचा मोबाईल बंद आहे. या निवडणुकीत पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांचा पाहुणचार केला जाणार असल्याचा इशाराही जाधव य़ांनी दिला आहे.
अविनाश जाधव म्हणाले की, उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्याचा दिवसाचा तो व्हिडिओ आहे. आम्हाला हा व्हिडिओ तिथं उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या माध्यमातून आलेले आहे, आम्ही तिथे थोडी कॅमेरे लावले होते. अद्याप तो उमेदवार आम्हाला भेटलाच नाहीये, तो फोन स्विच ऑफ करून तो गायब आहे. जर त्याला एक पोलिस वाला घेऊन जात असेल तर त्याला धमकवलाच असेल ना? त्याला आत मध्ये घेऊन जाणारा माणूस हा पोलिस ऑफिसर आहे. तो कुठल्या पोलीस स्टेशनला आहे कुठल्या क्राईम ब्रँचला आहे तो तुम्ही शोधा. ज्यांनी ज्यांनी शिवसेना मनसे पक्षाची गद्दारी केली आहे त्यांचा पाहुणचार होणार आहे.
पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार राजन विचारे यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. राजन विचारे म्हणाले, ‘महाराष्ट्रामध्ये 68 बिनविरोध निवडून आलेले आहेत. यात भाजपच्या 44, शिंदे गटाच्या 22 नगरसेवकांचा समावेश आहे. बिनविरोध निवडून यायचा हा नवीन फंडा सुरू झालेला आहे. मशीनमध्ये गडबड, वोट चोरी नंतर आता इलेक्शनच्या अगोदरच त्या ठिकाणी पैसे देऊन, धमक्या देऊन, पोलिसांना वापरून निवडणूक जिंकली जात आहे.’
एकही विरोधी उमेदवार बिनविरोध नाही
पुढे बोलताना विचारे म्हणाले की, ‘विरोधकांचे 336 फॉर्म बाद केले आहेत. एकूण 68 बिनविरोध आलेत, त्यातला एकही विरोधी पक्षाचा नाही, उद्धव ठाकरे गटाचा नाही, मनसे पक्षाचा नाही कशा पद्धतीने षडयंत्र केलेला आहे. नोटाचा पर्याय शिल्लक असतानाही बिनविरोध डिक्लेअर केलं. इथे पैशाचा वापर केलाय आता उरलेल्या शीट जे आहेत त्यासाठी देखील पैशाचा वापर केला जाणार आहे.’
