
नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असून राज्य विधिमंडळात 75 हजार 286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सोमवारी सादर करण्यात आल्या. यावरून राज्याचं वित्तीय नियोजन कोलमडल्याचं मानलं जात आहे. तर दुसरीकडे संसदेचंही हिवाळी अधिवेशन सुरू आहे. तक इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. सोमवारीही 562 उड्डाणं रद्द झाली. इंडिगोच्या सेवेत गोंधळ झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे पाच हजार उड्डाणे रद्द करण्यात आली. या गोंधळाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी येत्या बुधवारी डीजीसीएची उच्चस्तरीय समिती कंपनीचे प्रमुख पीटर एल्बिस यांना चौकशीसाठी बोलावणार आहेत. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
सिन्नर तालुक्यातील जोगल टेंभी शिवारात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून सुमारे पाच एकर ऊसाचे पीक पूर्णपणे जळून खाक झाले. जोगल टेंभी येथील गट नंबर 265/1 मध्ये ही दुर्दैवी घटना घडली. विजेच्या तारांच्या घर्षणातून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आग लागली आणि ती वेगाने पसरली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेनंतर शेतकऱ्यांनी त्वरित पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात 4 डिसेंबर रोजी मुळा नदीच्या पुलाखाली एका तीन महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती. आई वडिलांनीच त्याचा खून करून, विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह नदीच्या पुलाखाली फेकून दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
बीड नगरपरिषदेत गुंठेवारीची सत्यप्रत देण्यासाठी अभिलेख विभागातील शिपायाचे कामकाज पाहणाऱ्या आशिष मस्के याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बीडचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या घटनेने बीड नगरपरिषदेत खळबळ उडाली आहे.
मीरा रोडच्या इंद्रलोक फेस–6 मधील कस्तुरी हाइट्स इमारतीत आग लागल्याची घटना समोर आली आहे. मीटर बॉक्सला लागलेली आग फायर डक्टमधून थेट 12 व्या मजल्यापर्यंत पोहोचली आहे, आता इमारतीत दाट धूर पसरला आहे. इमारतीत 6 रहिवाशी अडकले होते, पण अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी सर्वांचा सुरक्षित बचाव केला आहे.
बोरीवली एक्सर गावात राहणाऱ्या मराठी विधवा महिलेचे घर बळकवण्यासाठी बाउन्सर्स घेऊन आला होता. ही माहिती मिळताच मनसेने नरेंद्र गुप्ताला चोपला. मनसेचे कृष्णा नकाशे म्हणाले की, एक्सर गाव बोरवली पश्चिम येथे राहणाऱ्या एका महिलेला तिच्या मयत पतीकडून व्यवहार करून घर विकत घेतल्याचे खोटे सांगून नरेंद्र गुप्ता नावाचा बिल्डर विनाकारण त्यांचे घर गेली बरीच वर्ष बळकावू पाहत होता. त्यांना त्रास देत होता. त्या महिला ऐकत नाही म्हटल्यावर बाउन्सर घेऊन त्या महिलेच्या टाळ तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न झाला ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळताच बाउन्सर्स आणि बिल्डर दोघांनाही त्यांची जागा दाखवली. ही घटना सोमवारी घडली.
इंडोनेशियातील जकार्ता येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. सात मजली इमारतीला आग लागली आहे. या घटनेत वीस जणांचा मृत्यू झाला आहे.
बिहार आणि इतर राज्यांमधील एसआयआरच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी पूर्ण केली. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही सुनावणी घेतली. पुढील सुनावणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे.
इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) आता त्याच्या सर्वात स्पर्धात्मक हंगामासाठी सज्ज झाली आहे, सीझन 3 खेळाडूंचा लिलाव 9 डिसेंबर रोजी मुंबईत होत आहे. भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उद्घाटनसाठी आशिष शेलार, अक्षय कुमार, हृतिक रोशन, अर्पिता खान शर्मा, सैफ अली खान उपस्थित होते.
भोकरदन येथील स्ट्राँग रूमला पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे. या स्ट्राँग रुमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील करडी नजर आहे. स्ट्राँग रूमबाहेर 21 तारखेपर्यंत पोलिसांचा 24 तास पहारा राहणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सोलापुरातील ब्रिटिशकालीन 103 वर्षांपूर्वीच्या पूलाच्या पाडकामाला स्थानिकांकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. आम्हाला पर्यायी रस्ता उपलब्ध करुन दिल्याशिवाय पूल पाडू देणार नसल्याची आक्रमक भूमिका सोलापूरकरांनी घेतली आहे. पूल पाडून दुसरा बांधण्याला आमचा विरोध नाही. मात्र वाहतुकीसाठी पर्यायी रस्ताच आम्हाला दिला नाही तर आम्ही हा पूल पाडू देणार नाही, अशी भूमिका सोलापूरकरांची आहे. तसेच प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करुन पूल पाडण्याचा निर्णय घेतला तर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार, असा इशाराही सोलापूरकरांनी दिला आहे.
नाशिकमधील येवला तालुक्यातील उंदीरवाडी शिवारात बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार पाहायला मिळाला. उंदीरवाडी येथे मक्याच्या शेतात बिबट्या लपून बसला होता. त्यामुळे वनविभागाकडून तपास सुरू होता. रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र बिबट्याने धूम ठोकली.
आगामी महापालिका निवडणुकांच्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून पुढील आठवड्यात सोमवार किंवा मंगळवारी महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जााहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरने आईला उद्धट बोलल्याच्या कारणावरून अज्ञात व्यक्तीने डॉक्टरला मारहाण केली. फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. पोलिसांनी तात्काळ संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी रुग्णालयातील डॉक्टरांनी मागणी केली आहे. डॉक्टरला मारहाण करणारा संबंधित व्यक्ती हॉस्पिटल मधून बाहेर जाताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.
अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात बिबट्याच्या दहशतीने वातावरण थरारले आहे. गावात भीतीचं सावट पसरलं असून बिबट्याने तिघांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील चिंता वाढली असून परिसरात घबराटीचं वातावरण आहे. दरम्यान, बिबट्याला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहे.
अजित पवारांनी चुकीच्या माणसाला जवळे केले अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर केली. देशमुख कुटुंबाला न्याय देण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा अशी मागणी त्यांनी केली. क्रूर लोकांना जवळ केल्यावर राग येणारच अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली.
तुकाराम मुंढेंविरोधात कारवाई करा अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे. मुंढे समर्थकांकडून आपल्याला धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तर याप्रकरणाची सत्यता तपासणी करावी अशी मागणी खोपडे यांनी केली आहे.
जळगावच्या जामनेर येथे शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा दिला जात आहे. जामनेर येथील स्ट्रॉंग रूम परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून एस आर पी एफ चे सशस्त्र जवान देखील तैनात करण्यात आलेले आहे. शिवसेना शिंदे गटाला देखील त्यांच्या सत्ताधारी मित्रपक्ष भाजपवर विश्वास नसल्याकारणाने स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून पहारा दिला जात आहे. दिवसातून तीन ते चार वेळेत आलटून पालटून राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तसेच कार्यकर्ते पदाधिकारी पहारा देत आहेत
वीज वितरण कंपनीच्या अनियमित आणि दुर्लक्षयुक्त कारभाराविरोधात मालेगाव येथील शेतकरी संतप्त दिसले. पोहाणे, रामपुरा, कजवाडे, आठवण परिसरातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. कांदा व डाळिंब उत्पादक शेतकरी वेळेवर वीज न मिळाल्याने मोठ्या संकटात सापडले. सोलर प्रोजेक्ट वरून वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वेळेप्रमाणे वीजपुरवठा न झाल्याने पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
सारंगखेड्याच्या घोडे बाजारात घोडा आणि बुलेट यांच्यात झालेल्या शर्यतीची मोठी चर्चा सुरू आहे. घोड्याच्या आणि बुलेट मोटरसायकलच्या शर्यतीत शेवटी घोड्यांनी बाजी मारली.घोडा वेगाच्या प्रतीक मानलं जात असतं या घोड्यांनी बुलेट सारखी मोटरसायकलला हरवून आपला वेग पुन्हा दाखवून दिला. मध्यप्रदेशच्या महेश्वर येथील यादव स्टड फार्मची वेगवान राणी घोडी हिने बुलेट सोबत रेसींग ट्रॅकवर रेस केल्याचे दिसून आले.
नाशिक – मंत्री माणिकराव कोकाटे बदनामी प्रकरणी बाजू मांडण्यासाठी कोर्टाने रोहित पवार यांना 16 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. कोकाटे यांचा ‘रम्मी खेळत’ असल्याचा व्हिडिओ कोणी काढला? पवारांना व्हिडिओ कोणी दिला? यावर अधिक तपासाची मागणी करण्यात आली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आज नाशिक कोर्टात आपापली बाजू मांडली .
रोहित पवार यांना स्वतः हजर राहण्याचे आदेश होते, तरीही त्यांनी कोर्टात वकिलांतर्फे बाजू मांडली. आणखी वेळ मागितल्याने कोर्टाकडून रोहित पवारांना अतिरिक्त मुदत मंजूर करण्यात आली आहे. मात्र पुढील सुनावणीला पवार यांनी स्वतः किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर रहावे असा आदेश कोर्टाने दिला आहे.
नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा सध्या प्रचंड गाजत आहे. कुंभमेळ्यासाठी झाडं तोडून जागा करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ नाशिककर एकवटले आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक रोडच्या भजनी मंडळाकडून तपोवनात आंदोलन करण्यात आलं. काठ्यांचे प्रात्यक्षिक करत आंदोलन केलं.
प्रवीण दरेकर यांच्याकडून विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला. दरेकरांकडून सूर्यकांत मोरे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल. प्रचारात सभागृहाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने हक्कभंग दाखल करण्यात आला.
पुण्यातील रमेश डाईंग या कपड्यांच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ही आग नेमकी कशी लागली, ते कारण स्पष्ट झालेलं नाही. संपूर्ण परिसरात दूरवर धुराचे लोट पसरले आहेत.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहायक संघटनेतर्फे नागपूर अधिवेशनावर चॉकलेट मोर्चा काढण्यात येणार आहे. 11 महिने प्रशिक्षण देऊन सरकारने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्या निषधार्थ हा चॉकलेट मोर्चा काढला जाणार आहे.
खेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढीव गस्त घालत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने होलेवाडी परिसरात एका संशयास्पद टाटा टेम्पोत दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडले. टेम्पोत स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी रॉड, कटावणी, चॉपर आणि बॅटरीसारखा घातक शस्त्रसाठा आढळला. पथकाने टेम्पोतील पाचपैकी तिघांना ताब्यात घेतले, तर दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या टोळीविरोधात खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासात ही टोळी गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक चोरी व दरोड्यांच्या गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे उघड झाले आहे.
आगामी सांगली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने रणशिंग फुंकले आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीत सोबत लढण्याची भूमिका जाहीर करत राष्ट्रवादी अजित पवार गटाने 30 जागांची मागणी केली आहे. सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जागांची मागणी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारी मागणी अर्ज आजपासून देण्यात येणार असल्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळेंनी स्पष्ट केला आहे. तसेच तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून उमेदवाराची चाचपणी करून उमेदवारी देण्याची भूमिका घेण्यात येईल,त्याच बरोबर निवडणुकीत जागांच्या बाबतीतला अंतिम निर्णय अजित पवार घेतली,असे स्पष्ट करत देखील महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल असा,विश्वास देखील व्यक्त केला आहे.
पुणे : सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मार्केट यार्ड परिसरातील हमाल भवन येथे ठेवण्यात आलं आहे. बाबा आढवांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी कुठलीही धार्मिक विधी पार न पाडता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बदनामी प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, रोहित पवार यांनी कोकाटे यांचा मोबाईलवर पत्ते खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्विट केला होता. ज्यामुळे राजकीय खळबळ उडाली होती. यामुळे कोकाटे यांचे कृषी खाते बदलले होते. कोकाटे यांनी बदनामीचा खटला दाखल केल्यानंतर, पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांच्या आरोपात तथ्य असल्याचा अहवाल समोर आला आहे. आज हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने रोहित पवार न्यायालयात हजर राहणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनाबाहेर आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) च्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील तायडे कुटुंबीयांची साधारण २०-२२ वर्षांपूर्वी साखर कारखाना सुरू करण्याच्या नावाखाली कथितरित्या एकनाथ खडसे यांनी कवडीमोल भावात बळकावलेली जमीन तातडीने परत मिळावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. खडसे यांच्या कारभाराचा निषेध करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच तायडे कुटुंबीयांवर झालेल्या अन्यायाची चौकशी करून बळकावलेली जमीन तात्काळ परत देण्याची मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा इशारा रिपाइंचे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
नाशिकच्या माँ गायत्री मार्केटिंग स्कीमद्वारे ९ हजार ७०० गुंतवणूकदारांना LED टीव्हीच्या आश्वासनावर कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या मुख्य आरोपी सारंगधर पानसरे अटक केली आहे. तब्बल ९ वर्षांनंतर नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा २ ने अटक केली आहे. पानसरेने गुंतवणूकदारांची ९ कोटी ११ लाख ८० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या राज्यभर गाजलेल्या फसवणूक प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
सामान्यांना 50 हजार बँकेत भरले तरी नोटीस येते… पोलीस माझ्याकडे आले तर मी त्यांना सर्वकाही सांगेल… महेंद्र दळवींच्या समोर एक व्यक्ती आहे, तिचा चेहरा दिसत नाही… अंबादास दानवे यांनी तीन व्हिडीओ ट्विट करत केला मोठा खुलासा…
धाराशिव जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये भूम नगरपालिकेचा समावेश आहे. शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संयोगिता गाढवे तर भाजप काँग्रेस सह ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार सत्वशीला थोरात यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली. भूम नगरपालिकेसाठी आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील नळणी शिवारात एका शेतकऱ्याने कपाशीच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी यावर कारवाई करत 4 लाख 95 हजारचा मुद्देमाल जप्त केलाय. महत्त्वाचं म्हणजे कपाशीच्या शेतात पोलिसांनी पाहणी केली मात्र ही गांजाची झाडे नेमके कोठे लागवड केली आहेत हे कळत नसल्याने शेवटी पोलिसांना ड्रोनच्या साह्याने याचा शोध घ्यावा लागला, त्यावेळी कपाशीच्या झाडात गांजाची लागवड असल्याच समोर आलं, दरम्यान या प्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला असून अधिकचा तपास सुरू आहे…
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद शाळेत चार महिन्यापासून डमी शिक्षक असल्याचं आढळून आलं. लाखभर पगार घेणाऱ्या शिक्षकाने सात हजारावर खाजगी शिक्षिका नेमली. शाळेच्या बोगस कारभाराच्या चौकशीची मागणी केली. जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजकुमार मेतकुटे यांनी जि. प. शाळेतील डमी प्रकरण व्हिडिओ चित्रीकरण करून उजेडात आणले.
नाशिक जिल्ह्यात अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये संताप. 75 वर्षीय नामदेव गुंजाळ या संशयित आरोपीकडून बालिकेवर अत्याचार.चिमुकलीला गेल्या सहा महिन्यांपासून पैशे, चॉकलेटचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप.
दहा लाख रुपयांचा डायमंड हार कचऱ्यात सापडूनही प्रामाणिकपणे परत करणाऱ्या मिरारोडमधील सफाई कामगार दांपत्याचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.
अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तीने नुकताच बाळाला जन्म दिल्याचा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या पतीसह सासू, सासरे, आई, वडील, मामा यांच्यासह नातेवाईक अशा १० जणांविरुद्ध बालविवाह व पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष देशमुख खून प्रकरणाला आज एक वर्ष पुर्ण होत असल्याने अभिवादन करण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील वाजता मस्साजोगमध्ये येणार आहेत. तर सायंकाळी 7 वाजता कॅन्डल मार्च काढला जाणार आहे.
एकीकडे अंबादास दानवेंनी शिंदेंचे आमदार महेंद्र दळवींचा कॅशसह व्हिडीओ समोर आणलाय तर, मनसेच्या संदीप देशपांडेंनी पिडब्लुडीच्या अधिका-यांचा लाच घेतांनाचा व्हिडीओ समोर आणलाय. विधिमंडळ अधिवेशनात ठाकरे बंधुंच्या नेत्यांच्या कॅश बॉम्बवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता
PWD बाब मनसे नेते संदीप देशपांडे धक्कादायक आरोप केला असून त्यांनी एक व्हिडीओही व्हायरल केला आहे .
नागपूर – नोकरीच्या आमिषाने लग्न करून फसविल्यामुळे कबड्डीपटू महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील माळेगाव टाऊन येथील धक्कादायक घटना आहे. किरण दाढे या कबड्डीपटू महिलेने आत्महत्या केली.
नागपूर- कोट्यवधींचा खर्च करून प्रभावी लसीकरण मोहिमा राबविण्यात येत असूनही बालमृत्यूचा प्रश्न गंभीरच आहे. राज्यात एका वर्षात तब्बल 11,960 बालकांचे मृत्यू झाले आहेत. नागपुरात मार्च 2024 ते मार्च 2025 दरम्यान 1,172 बालमृत्यूंची नोंद झाली. नागपुरात जन्मानंतरच्या पहिल्या 28 दिवसांत 854 नवजातांचे मृत्यू झाले.
नागपूर- विदर्भ मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र कायम आहे. मराठवाड्यातील आठ आणि विदर्भातील सहा अशा एकूण 14 जिल्ह्यांमध्ये आठ महिन्यात तब्बल 1183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 43 हंगामातील शेतकरी आत्महत्येचा आकडा तब्बल पस्तीस हजारांवर पोहोचला आहे.
धुळे शहराचा आणि जिल्ह्याचा तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा 5.3 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. तापमान कमी झाल्याने थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. थंडी वाढल्याने शाळेचा वेळ बदलण्याची मागणी पालकांनी केली आहे.
पालिका निवडणूका महायुती म्हणूनच लढवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये यासंदर्भात दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण होते उपस्थित होते. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रितपणे लढवण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.
महापालिकानिहाय स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये येत्या दोन- तीन दिवसांत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू होणार आहे. भाजप आणि शिवसेनेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांना एकमेकांच्या पक्षांमध्ये प्रवेश न देण्यावरही शिक्कामोर्तब झाला आहे.