उद्धव आणि राज ठाकरे पाय तोडण्याच्या धमक्या देतायेत, भाजपच्या नेत्याचा गंभीर आरोप, राजकारणात खळबळ
Politics : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ शिवाजी पार्कवर ठाकरे बंधुंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषणात राज ठाकरे यांनी भाजपच्या एका नेत्यावर भाष्य केले होते, त्यानंतर आता या नेत्याने ठाकरे बंधुंवर मोठा आरोप केला आहे.

राज्यात सध्या महानगर पालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यातील बडे नेते दररोज वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत. या सभांमध्ये एकमेकांवर वेगवेगळे आरोप केले जात आहे. विरोधी पक्षातील नेते भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधत आहेत. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूतील भाजपचे नेते के अन्नामलाई हे मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी बॉम्बे हे केवळ महाराष्ट्रातील शहर नाही तर एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी अन्नामलाई यांच्यावर भर सभेतून टीका केली होती. त्यानंतर आता अन्नामलाई यांनी ठाकरे बंधुंवर गंभीर आरोप केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
तामिळनाडूतून रसमलाई आली होती – राज ठाकरे
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ शिवाजी पार्कवर ठाकरे बंधुंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषणात राज ठाकरे यांनी म्हटले की, ‘राज ठाकरे म्हणाले की मराठी म्हणून मराठी माणसांनी एकत्र येऊच नये असे षडयंत्र आहे. तुम्हाला मुंबईतच घरे नाकारली जात आहेत. काल परवा ती तामिळनाडूतून रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबई आणि महाराष्ट्राचा संबंध काय ? भ*व्या तुझा काय संबंध इथे यायचा. याच्यासाठीच बाळासाहेब म्हणाले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी.’
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मला धमक्या देत आहेत – अन्नामलाई
याला उत्तर देताना अन्नामलाई यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मला धमक्या देत आहेत. मुंबईत पाय ठेवला तर पाय तोडू असं सामनामध्ये लिहिलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे माझ्याविषयी खूप काही बोलले. मी मुंबईत येणार, कारण मी धमक्यांना घाबरत नाही. मला धमकावणारे ठाकरे कोण आहेत? मला शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा अभिमान आहे. त्यांनी फक्त मला शिवीगाळ करण्यासाठी सभा घेतली होती.
पुढे बोलताना अन्नामलाई म्हणाले की, ‘मला माहित नाही की मी इतका महत्त्वाचा का झालो आहे. मला धमक्या देण्यात आल्या. जर मला अशा धमक्यांची भीती वाटत असती तर मी माझ्या गावातच राहिलो असतो. मी म्हटले की मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे, तर याचा अर्थ असा आहे का की ते महाराष्ट्रातील लोकांनी उभारलेले नाही? असा सवालही अन्नामलाई यांनी उपस्थित केला आहे.
