मोठी बातमी! राज ठाकरेंच्या भाषणापूर्वीच उद्धव ठाकरेंचा मनसेसोबतच्या युतीबाबत सर्वात मोठा दावा
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत बोलताना आता उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

हिंदीच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं होतं, पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी भूमिका अनेक संघटना आणि पक्षाची होती. याच मुद्द्यावर मनसेनं मोठं आंदोलन उभारलं, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं देखील या आंदोलनात उडी घेतली. राज्यभरातून विरोध होत असल्यानं अखेर सरकारनं त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर मागे घेतले.
दरम्यान त्रिभाषा सूत्राचे जीआर मागे घेतल्यानंतर मुंबईत विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. तब्बल वीस वर्षांनंतर ते एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं. यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. आज राज ठाकरे यांची मीरा रोड येथे सभा होणार आहे, मात्र या सभेपूर्वीच युतीसंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत हेते.
वीस वर्षांनंतर आम्ही पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आलो, पहिल्यांदा मराठीच्या विषयावर एकत्र आलेलो आहोत. मी तेव्हाच सांगितलं आहे की आम्ही एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी, त्यामुळे आम्ही मराठीच्या विषयावर एकत्र राहणारच. मुद्दा पुढे येतो तो राजकारणाचा आज कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाहीये, ज्यावेळी निवडणूक जाहीर होईल त्यावेळी आम्ही त्यावर चर्चा करू, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला. कोणत्याही भाषेची सक्ती आम्ही लागू करू देणार नाही, याचा अर्थ असा होत नाही की आम्ही एखाद्या भाषेला विरोध करतोय असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे मात्र राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना युतीच्या विषयावर सबुरीचा सल्ला दिला असल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेच्या शिबिरात देखील त्यांनी मोठं वक्तव्य केलं होतं, आम्ही मराठीसाठी एकत्र आलो होतो, तो विषय तेवढ्यापुरताच मर्यादीत आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. आजच्या सभेत राज ठाकरे हे काय भूमिका मांडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
