ज्यांनी शिवसेनेला हादरे देण्याचा प्रयत्न केला ते…, संजय राऊतांचा शिवाजी पार्कवरून थेट शिंदेंना इशारा, नेमकं काय म्हणाले?
आज शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर सुरू आहे, या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आज शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर सुरू आहे, या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्लीतील रावणाला जाळायचं आहे, मुंबईतल्या रावणाला बुडवायचं आहे, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला आहे, नेहमी रावणाचं दहन होतं, आज आपल्याला अंत कारायचा आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत?
ज्या शिवसेनेची स्थापना या शिवतीर्थावर करण्यात आली, त्या शिवसेनेचा दसरा मेळावा ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मराठी माणसांची भक्कम एकजूट ज्या शिवसेना प्रमुखांनी केली, त्या शिवसेनेला हादरे देण्याचा प्रकार कोणी किती ही केला तरी त्या हादऱ्यामध्ये आपण संपून जाणार आहात, आज मला अनेकांनी प्रश्न विचारले अनेकांनी शंका उपस्थित केल्या, शिवतीर्थावर चिखल झालेला आहे, म्हणजे तुम्ही चिखलफेकच करणार मी म्हटल होय या गद्दारांवर चिखेलफेकच करणार. त्यांची तीच लायकी आहे, असं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे, मराठवाडा संपूर्ण पाण्यात आणि चिखलात आहे. आठ-आठ दिवस शेतकरी चिखलात आहेत. आज जर आपण दोन तास पाण्यात आणि चिखलात सभा घेतली तर वाईट वाटण्याचं काम नाही, कारण जर महाराष्ट्रात ओला दुष्काळ असेल तर हा ओला दसरा मेळावा आहे. मित्रांनो आज रावणाचा अंत करायचा आहे, नेहमी रावणाचं दहन होतं, आता पावसात रावणाचा अंत कसा करायचा? रावणाला जाळायचं की बुडवायचं याचा विचार करावा लागेल. उद्धव साहेबांनी शस्त्र पूजा केलेली आहे. शस्त्रपूजेचा मान हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. मला विचारलं गद्दारांच्या मेळाव्यात ते काय पुजणार, मी म्हणालो त्यांना शस्त्र पूजेचा अधिकार असूच शकत नाही. मग ते काय पूजणार, मग मला सांगण्यात आलं, त्यांनी दिल्लीतून अमित शाहांचे जोडे आणले आहेत. ते त्यांच्या व्यासपीठावर आहेत, आणि त्याचं ते पूजन करणार आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर केला आहे.
