आम्ही युती आणि आघाडीचे बळी ठरलो… उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आम्ही आम्ही युती आणि आघाडीचे बळी ठरलो असं विधान केलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. उद्धव ठाकरे यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी म्हणून एकत्र लढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीवर भाष्य केले आहे. आम्ही आम्ही युती आणि आघाडीचे बळी ठरलो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आघाडी म्हणून निवडणूक लढवणार का?
आघाडी म्हणून निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘हा प्रश्न तिन्ही पक्षाने सोडवला पाहिजे. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढलो. तिन्ही पक्षाने एकत्र लढलं पाहिजे. तिन्ही पक्षांना वाटलं एकत्र लढायचं तर लढू शकतो. पण कुणाला वाटलं स्वतंत्र लढायचं तर तसं होऊ शकतं. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्या स्थानिक नेते पदाधिकार्यांच्या भावनाही समजून घेऊ.’
आम्ही युती आणि आघाडीचे बळी ठरलो – उद्धव ठाकरे
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘शिवसेनेची ताकद पुण्यात आहे. पण आम्ही आतापर्यंत युती आणि आघाडीचे बळी ठरलो. त्यावेळी युती म्हणून पुण्याकडे दुर्लक्ष केलं. त्याबद्दल मी पुणेकरांची माफी मागतो. पण पुणेकरांना हवं असेल तर मी पूर्ण ताकदीने शिवसेना इथे कामाला लावेल. पण हे पुणेकरांनी ठरवायचं आहे. तुम्ही जर प्रेमाने बोलावलं तर मी येईन पुण्यात. मी पुन्हा नाही पण पुण्यात येईन.’ उद्धव ठाकरे यांनी हे विधान यामुळे केले आहे की, पुण्यातील जागावाटपात शिवसेनेला खूप कमी जागा देण्यात आल्या होत्या.
मी मोदींनाही शत्रू मानत नाही – उद्धव ठाकरे
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मी कुणाला शत्रू मानत नाही. मोदींनाही मानत नाही. ते मानत असतील तर माहीत नाही. देवेंद्र फडणवीस यांना विरोधक म्हणून बोलत नाही. पण फडणवीस आज हतबल झालेत. कशामुळे हतबल आहेत माहीत नाही. त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. एवढ्या वर्षानंतर बहुमत आहे. केंद्र सरकार त्यांच्या पाठी आहे. एवढं पाठबळ असलेला मुख्यमंत्री एवढा हतबल का हे माहीत नाही. याचं कारण म्हणजे खुले आम भ्रष्टाचार सुरू आहे. आम्ही गेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात काही मंत्र्याची पुराव्याने प्रकरण आणली. त्यांच्यावर कारवाई झाली नाही.’
