वापरायचं आणि फेकून द्यायचं, आता आम्ही दोघं…; उद्धव ठाकरे स्षप्टच बोलले
विजयी मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी 'वापरायचं आणि फेकायचं. आजपर्यंत वापर करून घेतला' असे म्हटले.

ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा आज वरळीत होत आहे. जवळपास 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले आहेत. या मेळाव्याला राज्यभरातून लाखो शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी हजेरी लावली आहे. वरळी डोममध्ये या मेळाव्यासाठी तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी सरकारला चांगलेच फटकारले आहे. ‘वापरायचं आणि फेकायचं. आजपर्यंत वापर करून घेतला. आता आम्ही दोघं वापर करून फेकणार आहे’ असे ते स्पष्टपणे बोलले आहेत.
‘आता आम्ही दोघं वापर करून फेकणार आहे’
“राज आणि मी अनुभव घेतला आहे. या नतद्रष्टांचा. वापरायचं आणि फेकायचं. आजपर्यंत वापर करून घेतला. आता आम्ही दोघं वापर करून फेकणार आहे. अरे डोक्यावर शिवसेनाप्रमुख नसते तर तुम्हाल ओळखत कोण होतं महाराष्ट्रात? कोणत्या भाषेत बोलत होता. राज तू सर्वांची शाळा काढली. मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. मोदींची शाळा कोणती? सर्वच उच्च शिक्षित आहे. भाजप ही अफवांची फॅक्ट्री आहे. मधल्या काळात सुरू केलं की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही मराठी बोलणारे कडवट हिंदुत्ववादी आहोत. तुम्ही काय हिंदुत्व शिकवता. ९२-९३ साली माझ्या शिवसैनिकांनी वाचवलं”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
‘आहोत आम्ही गुंड’
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “फडणवीस म्हणाले, भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंडगिरी म्हणत असेल तर आम्ही गुंड आहोत. आहोत आम्ही गुंड. न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी आहे. गुंड गिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिलत नसेल तर गुंडगिरी करूच. हे राजकीय बाडगे आहेत.”