मोठी बातमी! राजकारणात मोठा भूकंप, उद्धव ठाकरेंचे मुंबईतील नगरसेवक फुटणार? एकनाथ शिंदेंच्या विधानामुळे खळबळ
मुंबईमध्ये महापौर कोणाचा होणार भाजप की शिवसेना? याबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे, यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागला आहे. या महापालिकांमध्ये महापौर बसवण्यासाठी मोठी कवायद सुरू आहे. मात्र, मुंबई महापालिकेत महापौर बसवण्यासाठी हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाल्याने मुंबईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणुकीचे निकाल लागताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. नगरसेवक फुटू नये म्हणून शिंदे यांनी ही काळजी घेतली आहे. त्यातच आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हॉटेलमधील नगरसेवकांना संपर्क साधण्याचे अन्य मार्ग असल्याचं जाहीर विधान करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यापार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच शिंदे यांनी केलेल्या सूचक विधानामुळे आता ठाकरे गटातच मोठं खिंडार पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी आज ठाकरे गटाला उघडच इशारा दिल्याने मोठी खळबळ उडाली असून महापौरपदाच्या निवडणुकीत मोठ्या उलथापालथी होणार असल्याचं चित्र आहे.
मुंबईतील हॉटेल ताज लॅंड्स एंड येथे शिंदे गटाच्या सर्व नगरसेवकांना ठेवण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आज या नगरसेवकांशी संवाद साधला. नगरसेवक म्हणून काय कामं करायची? नागरिकांशी कसं वागायचं, महापालिकेतील कामकाज कसं करायचं याची माहिती एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना दिली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधून विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांना तुमचे नगरसेवक फुटू नये म्हणून हॉटेलमध्ये ठेवले आहेत. तुम्हाला नगरसेवक फुटण्याची भीती आहे, असा दावा ठाकरे गटाने केल्याचं शिंदे यांना विचारण्यात आलं. त्यावर एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंनाच त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवण्याचा इशारा दिला आहे.
तुम्हीच तुमचे नगरसेवक…
आमचे निवडून आलेले सर्व नगरसेवक इथे आहेत. त्यांच्याशी मी संवादही साधला आहे. आम्हाला कोणतीही भीती नाही. ठाकरेंना त्यांच्या नगरसेवकांची भीती आहे. त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत, असा सूचक इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. शिवसेना ही घाबरणारी पार्टी आहे का? आम्ही घाबरणारे नाहीत. शिवसेनेला लोक घाबरतात. सर्व नगरसेवक इथेच आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
कधीपर्यंत हॉटेलात?
दरम्यान, मुंबईचा महापौर ठरेपर्यंत हे नगरसेवक हॉटेलात राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस येथे गेले आहेत. पाच दिवसानंतर ते येणार आहेत. त्यानंतर भाजपमधील महापौरपदाचा उमेदवार ठरला जाईल. त्यानंतर ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या 29 नगरसेवकांना हॉटेलात राहावं लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे रोज या नगरसेवकांना येऊन भेटणार असल्याचीही माहिती आहे.
