मध्य आणि पश्चिम रेल्वेवर असमान आपत्कालीन वैद्यकीय सेवा,लोकल प्रवाशांच्या जीवाला धोका
पश्चिम रेल्वे सारखेच मध्य रेल्वेच्या स्थानकांवर लोकलमधून पडून किंवा लोकल पकडताना होणाऱ्या अपघाताचे प्रमाण सारखेच असताना प. रेल्वेने त्यांच्या स्थानकावर इर्मजन्सी मेडिकल रुम उभ्या केल्या आहेत, मात्र मध्य रेल्वेच्या मेडिकल रुम्स बंद पडल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर आपात्कालिन स्थितीत प्रवाशांच्या वैद्यकीय प्रथमोपचारासाठी मेडिकल रुम्स आणि १०८ एम्ब्युलन्सची सेवा पुरवण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश आहेत. असे असताना अलिकडेच मुंब्रा येथील लोकल अपघाताच्या वेळी एम्ब्युलन्स उशीरा घटना स्थळी पोहचल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशाचे पालन होत नसल्याचा मुद्दा सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते समीर झवेरी यांनी उपस्थित केला आहे. या वैद्यकीय सेवांचे वाटप मध्य आणि पश्चिम रेल्वेवर असमान असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
या संदर्भात समीर झवेरी यांनी म्हटले आहे की ४ जुलै २०२५ रोजी रेल्वेने दिलेल्या माहीतीत पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय मार्गावर २९ स्थानके त्यांच्या अखत्यारीत येत आहेत. यातील २४ स्थानकात १०८ एम्ब्युलन्सची सेवा तैनात आहे. तर १४ रेल्वे स्थानकांत वैद्यकीय कक्ष स्थापन केले असून उर्वरित रेल्वे स्थानकात काम चालू असल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.
समीर झवेरी यांनी सांगितले की माझ्या माहीतीप्रमाणे मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर कल्याण स्थानकातील आपात्कालिन वैद्यकीय कक्ष सुरु आहे. १२५ रेल्वे स्थानकांपैकी साधारण १५ रेल्वे स्थानकांवर १०८ एम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध आहे. जर पश्चिम रेल्वेने त्यांच्या स्थानकात १४ रेल्वे स्थानकात आपात्कालिन वैद्यकीय कक्ष उभारले आहेत तर मध्य रेल्वेच्या स्थानकातील आपात्कालिक कक्ष का बंद आहेत असा सवाल समीर झवेरी यांनी केला आहे.
अपघाताचे प्रमाण मोठे
मध्य रेल्वेवर कुर्ला, ठाणे, कळवा, कल्याण या स्थानकात लोकलमधून पडून तसेच लोकल पकडताना पडल्याने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण मोठे आहे. जखमी प्रवाशांना गोल्डन अवरमध्ये तातडीचे वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे वैद्यकीय कक्ष उभारण्याची गरज असताना मध्य रेल्वे का दुर्लक्ष करीत आहे असाही सवाल झवेरी यांनी केला आहे.
