
अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला, दरम्यान या अपघातासंदर्भातील प्राथमिक अहवाल आता समोर आला आहे. 22 पानांचा हा प्राथमिक अहवाल आहे. त्यामध्ये या अपघातासंदर्भात कोण कोणत्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली, त्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. हा अहवाल एएआयबीकडून देण्यात आला आहे.
दरम्यान अजित पवार यांचा ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी दृश्यमानता कमी होती, असं या प्राथमिक अहवालामध्ये म्हटलं आहे. तसेच डेटा रिकव्हर करण्यात यश आल्याचा दावा देखील या अहवालात करण्यात आला आहे. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलो या अपघातासंदर्भात जे पुरावे मिळाले त्यावरून निष्कर्ष काढण्यात आले, असं या अहवालात म्हटलं आहे.
या रिपोर्टमधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, अपघात घडण्यापूर्वी शेवटचं संभाषण नेमकं काय झालं होतं? या संभाषणासंदर्भातील डिटेल्स या अहवालामध्ये देण्यात आली आहे. 8 वाजून 29 मिनिटं, 25 सेंकद इथपासून ते 8 वाजून 46 मिनिट आणि 13 सेंकदांपर्यंत म्हणजे अपघातापर्यंत विमान आणि बारामती एटीसी यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला? याची सेकंदा -सेकंदाची माहिती या अहवामामध्ये नमूद करण्यात आली आहे. शेवटचा सवांद हा 8 वाजून 46 मिनिट आणि 13 सेंकदाने झाला, ज्यामध्ये पायलट ओशेट, ओशेट असं म्हणत आहे, मात्र त्याला त्यानंतर बारामती एटीसीकडून कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाहीये, हाच तो शेवटचा सवांद आहे.
दरम्यान या अहवालामध्ये अजूनही काही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. हे विमान हवेत घिरट्या घालत होतं, त्यानंतर ते जमिनीला धडकलं आणि मोठा स्फोट झाला अशी माहिती समोर आली होती, मात्र या रिपोर्टमधून आता नवीन माहिती समोर आली आहे. हे विमान जमिनीला धडकण्यापूर्वी एका झाडावर कोसळलं आणि त्यानंतर ते जमिनीला धडकलं अशी माहिती आता समोर आली आहे. तसेच विमानातील शेवटचा संवाद देखील समोर आला आहे. हा प्राथमिक अहवाल आहे.