Maratha Reservation: ‘मुख्यमंत्री असताना का हिंमत दाखवली नाही’, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवं असं विधान केलं आहे. याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी हजारो मराठा आंदोलकांसह मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावे अशी जरांगे पाटलांची मागणी आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवं असं विधान केलं आहे. याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘नाईलाजाने त्यांना न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलं आहे. त्यावेळी फडणवीसांनी सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार असतं तर त्यांनी यांना न्याय दिला असता. दुसरे एक आहेत त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. आतापर्यंत या लोकांना वापरुन फेकून देण्यात आलं. पण मग आता त्यांचे सरकार आहे, त्यामुळे त्यांनी आरक्षण द्यायला हवे. मराठी माणूस मुंबईत नाही येणार तर मग सुरत आणि गुवाहाटीला जाणार का? असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.
एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर
उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे म्हणाले की, ‘मी मुख्यमंत्री असताना 10 टक्के आरक्षण दिले होते, त्याचा फायदा आजही मराठा समाजाला होत आहे. सारथीच्या माध्यमातून देखील अनेक योजना आणल्या त्याचा फायदा मराठा समाजाला होत आहे. आम्ही बिन व्याजी कर्ज देतोय, वसतीगृह दिले. यामुळे UPSC MPSC मध्ये मराठा समाज पुढे जातोय
देवेंद्र फडणवीस यांनी देखील आरक्षण दिले होते पण मविआ सरकारला ते टिकवता आले नाही. मराठा समाजाला विनंती करतो जे जे करता येईल ते आम्ही करु. ओबीसी आरक्षण काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे कोणाचीच भूमिका नाही. याचे काढून त्याला देणे, हे करता येणार नाही. मराठा समाज आर्थिक मागास आहे. त्यांना दिलेले आरक्षण टिकले पाहिजे असा प्रयत्न सरकारचा आहे.
उद्धव ठाकरेंनी हिंमत का दाखवली नाही?
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, जे आम्ही दिले त्याच्यावर आज विरोधक टीका करता आहेत. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना बैठकीला बोलावले तेव्हा का आले नाही? दुटप्पी भूमिका का घेतात? मराठा समाज बद्दल किती कळवळा आहे? मराठा समाजावर सामनातून टीका केली गेली, त्यांना यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. मतांसाठी फक्त ते राजकारण करतात. त्यांच्यात हिंमत होती तर मुख्यमंत्री असताना का हिंमत दाखवली नाही? यांनी मराठा समाजासाठी काय केले? यांना मराठा समाजावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
