नवी मुंबईत 'सिडको' विकास अधिकाऱ्याला काळे फासले, सहा पदाधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा

भरत ठाकूर यांनी मानसिक त्रास दिल्यामुळे आगवणे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांच्यावर करुन सिडकोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या तोंडाला काळे फासले होते.

नवी मुंबईत 'सिडको' विकास अधिकाऱ्याला काळे फासले, सहा पदाधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा

नवी मुंबई : ‘सिडको’तील विकास अधिकारी भरत ठाकूर यांच्या तोंडाला शाई लावणाऱ्या सहा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत ठाकूर यांच्या तोंडाला काळे लावणाऱ्या सिडकोच्या अधिकाऱ्यांविरोधात सीबीडी-बेलापूर पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. (Six CIDCO officers booked for throwing Ink on Project Officer Bharat Thakur)

सिडको प्रशासनानेही या अधिकाऱ्यांविरोधात दक्षता समितीमार्फत विभागीय चौकशी सुरु केली आहे. आरोपींनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.

काय आहे प्रकरण?

भरत ठाकूर 2019 मध्ये सिडकोच्या सामान्य प्रशासन विभागात विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या विभागात काम करणारे सहाय्यक विकास अधिकारी मयुर आगवणे यांनी मे 2019 मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ठाकूर यांनी मानसिक त्रास दिल्यामुळे आगवणे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांच्यावर करुन सिडकोच्या अधिकाऱ्यांनी भरत ठाकूर यांच्या तोंडाला काळे फासले.

कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी नीलेश तांडेल, विनोद पाटील, यतिश पाटील, विकास मुकादम, अतिम म्हात्रे आणि जे. टी. पाटील यांनी ठाकूर यांच्या तोंडाला शाई लावली. त्यानंतर अर्वाच्च भाषेत जातीवाचक शिवीगाळ करत पुन्हा सिडको कार्यालयात न येण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. ठाकूर यांनी सर्वांना समजावण्याचे प्रयत्न केले होते; मात्र कोणीही त्यांचे ऐकून न घेता शिवीगाळ व मारहाण केल्याचा दावा केला जात आहे.

शाई फासणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ठाकूर यांनी सिडको प्रशासनाकडे केली होती. सिडको व्यवस्थापनाने त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी उलट भरत ठाकूर यांची एक महिन्याने औरंगाबाद कार्यालयात बदली केली.

ठाकूर यांची बदली 26 फेब्रुवारी 2020 रोजी औरंगाबादहून पुन्हा सिडकोच्या नवी मुंबई कार्यालयात झाली. तेव्हा ठाकूर यांनी सहा जणांवर केलेल्या कारवाईबाबत विचारणा केली असता, सिडकोने कोणतीच कारवाई न केल्याची बाब समोर आली. त्यानंतर ठाकूर यांनी स्वतःला न्याय मिळावा, यासाठी सीबीडी-बेलापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. सहा जणांविरोधात जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि धमकावल्याबाबत अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. (Six CIDCO officers booked for throwing Ink on Project Officer Bharat Thakur)

या प्रकरणाचा तपास सुरु असून सहा आरोपींना अद्याप अटक केलेली नाही. लवकरच त्‍यांना अटक होईल, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त भरत गाडे यांनी दिली.

सिडकोतील अधिकारी भरत ठाकूर यांना शाई लावणाऱ्या सहा अधिकाऱ्यांना नवी मुंबई शहरातील एका माजी मंत्र्याची मदत होत असल्याचा आरोप केला जात आहे.

(Six CIDCO officers booked for throwing Ink on Project Officer Bharat Thakur)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *