मुंबईत दाखल होताच योगी आदित्यनाथ यांची अक्षय कुमारसोबत बैठक, उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारण्याबाबत चर्चा

योगी आदित्यनाथ मुंबईत दाखल होताच त्यांनी अक्षय कुमारची भेट घेतली (UP CM Yogi Adityanath meet Akshay Kumar).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 0:30 AM, 2 Dec 2020

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. योगी मंगळवारी (1 डिसेंबर) संध्याकाळी मुंबईत दाखल होताच त्यांनी अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली. त्यांची भेट मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये झाली (UP CM Yogi Adityanath meet Akshay Kumar).

योगी आदित्यनाथ यांनी अक्षय कुमार सोबत उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्ध नगर येथील यमुना एक्सप्रेस वे जवळ तयार होणाऱ्या फिल्मसिटीबाबत चर्चा केली. योगी यांनी अक्षय कुमारची भेट घेतल्यानंतर ट्विटरवर या भेटीबाबत माहिती दिली.

“आज मुंबईत भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार यांची भेट घेतली. चित्रपटसृष्टीतील विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांचा कामातील ध्यास तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

योगी आदित्यनाथ उद्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला जाणार आहेत. त्यानंतर ते दुपारी गुंतवणुकदार आणि चित्रपट निर्मात्यांशी चर्चा करणार आहेत. उद्योगपतींशी चर्चा केल्यानंतर योगी आदित्यनाथ पत्रकार परिषद घेतील.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी निर्माण करण्याच्या निर्णयाचं उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या राज्यातील कलाकारांकडून समर्थन केलं जात आहे. नव्या फिल्मसिटीच्या निर्माणामुळे हिंदी कलाकारांच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल, अशी काही कलाकारांनी आशा आहे. योगी आदित्यनाथ यांच्या या पावलामुळे नवोदित कलाकारांना बॉलिवूडमध्ये जाण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागणार नाही, अशी अनेकांना आशा आहे.

संबंधित बातमी :

उद्योगांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही; योगींच्या दौऱ्याची भाजपकडून पाठराखण