शेतकऱ्यांच्या मोर्चाला 'उलगुलान' नाव का?

नामदेव अंजना, टीव्ही 9 मराठी, मुंबई विविध मागण्यांसाठी राजधानी मुंबईत आदिवासी आणि शेतकरी बांधव दाखल झाले आहेत. रोजच्या जगण्यातल्या बारीक-सारीक गोष्टींपासूनही वंचित राहिलेल्या या बांधवांनी आता सरकारविरोधात पेटून उठवण्याचे ठरवले आहे. आमच्या न्याय्य मागण्या मायबाप सरकारने पूर्ण कराव्यात, एवढी माफक अपेक्षा घेऊन अनवाणी पायी शेतकरी आणि आदिवासी बांधव शेकडो किलोमीटर चालत राजधानीत आले आहेत. या …

शेतकऱ्यांच्या मोर्चाला 'उलगुलान' नाव का?

नामदेव अंजना, टीव्ही 9 मराठी, मुंबई

विविध मागण्यांसाठी राजधानी मुंबईत आदिवासी आणि शेतकरी बांधव दाखल झाले आहेत. रोजच्या जगण्यातल्या बारीक-सारीक गोष्टींपासूनही वंचित राहिलेल्या या बांधवांनी आता सरकारविरोधात पेटून उठवण्याचे ठरवले आहे. आमच्या न्याय्य मागण्या मायबाप सरकारने पूर्ण कराव्यात, एवढी माफक अपेक्षा घेऊन अनवाणी पायी शेतकरी आणि आदिवासी बांधव शेकडो किलोमीटर चालत राजधानीत आले आहेत. या मोर्चाला ‘उलगुलान मोर्चा’ असे संबोधले आहे. यातल्या ‘उलगुलान’चा नेमका अर्थ काय, ते पाहूया :

बांगलादेश, नेपाळ आणि भारताच्या पूर्वेकडील राज्यांमधील अनेक भागात मुंडा भाषा बोलली जाते. ‘उलगुलान’ हा शब्द या भाषेतील आहे. ‘उलगुलान’ या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘सार्वजनिक उठाव’ असा होतो. मात्र, विद्रोह, बंड, आंदोलन, क्रांती शब्दांसाठीही ‘उलगुलान’ शब्द पर्याय म्हणून वापरला जातो.

‘उलगुलान’ शब्दाला ऐतिहासिक आणि धगधगती पार्श्वभूमी आहे. इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात, जुलमी ब्रिटीश राजवटीविरोधात लढलेल्या ‘जननायक’ बिरसा मुंडा यांच्या संघर्ष आणि लढ्याशी ‘उलगुलान’ शब्द जोडला आहे. बिरसा मुंडा यांच्या आंदोलनाचं नाव ‘उलगुलान’ असे होते. बिरसा मुंडा यांनीच पहिल्यांदा ‘उलगुलान’ शब्दाला जाहीर वापरण्यास सुरुवात केली, असे सांगण्यात येते.

कोण होते बिरसा मुंडा ?

झारखंडमधील उलिहातू या गावी बिरसा मुंडा यांचा जन्म झाला. जर्मन मिशनरी स्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या बिरसा मुंडा यांचा स्वभाव सगळ्यांशी मिळून-मिसळून वागण्याचा होता. तरुण वयातच त्यांनी समविचारी तरुणांची संघटना बांधली होती.

वडिलांचे म्हणजेच सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याने ख्रिस्ती मिशनरी आणि इंग्रजांबद्दल बिरसा यांच्या मनात संताप होता. तसेच, अशिक्षित आणि गरीब आदिवासींवर ब्रिटिशांकडून होणारा छळ पाहिल्यानंतर, ब्रिटिशांना धडा शिकवण्याचं बिरसा मुंडांनी ठरवलं आणि ब्रिटिशांविरोधात बंड पुकारलं. या आंदोलनाला ‘उलगुलान’ असे नाव दिले.

पुढे बिरसा मुंडा यांना इंग्रजांनी अटक केली आणि तुरुंगात डांबले. तुरुंगात बिरसा मुंडा यांचा प्रचंड छळ करण्यात आला. 1900 साली बिरसा मुंडा यांचा रांचीच्या तुरुंगातच मृत्यू झाला. आदिवासींचे नायक आणि स्वातंत्र्य लढ्याच्या पहिल्या फळीतले लढवय्ये म्हणूनही बिरसा मुंडांना ओळखले जाते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *