Operation Sindoor : भारताकडून पाकिस्तानातील ही 9 ठिकाणं उद्ध्वस्त, मशिदींमधून आता अशी घोषणा
भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केली आहे. भारताने 'मिशन सिंदुर' अंतर्गत ही कारवाई केली आहे. भारताने केलेल्या या कारवाईत 50 पेक्षा दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधील मशिदींमधून नक्की काय घोषणा केली जात आहे? जाणून घ्या

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतायींमध्ये संतापाची लाट होती. पाकिस्तानने केलेल्या या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला त्यांच्याच भाषेतच उत्तर द्या, अशी मागणी भारतीयांकडून करण्यात येत होती. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरु होती. त्यानंतर भारतीय सैन्याकडून आता बुधवारी 7 मे रोजी मध्यरात्री 2 वाजता पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आली. भारताकडून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आली. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानमधील मशीदीमधून घोषणा करण्यात येत आहे.
पाकिस्तानमधील मशीदीमधून घोषणा करण्यात येत आहे.
नागरिकांनी घर सोडावं आणि सुरक्षित ठिकाणी जावं, अशी घोषणा पाकिस्तानमधील मशीदीमधून या एअर स्ट्राईकनंतर करण्यात येत आहे. भारताने केलेल्या या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण आहे. त्यामुळे मशिदींच्या माध्यमातून नागरिकांना आपलं राहतं घर सोडून सुरक्षित ठिकाणी जावं, असं आवाहन केलं जात आहे. पाकिस्तान सरकारकडून मशिदींच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत हा संदेश पोहचवला जात आहे. सरकारच्या या आवाहनानंतर नागरिक घरातून बाहेर पडत आहेत.
नक्की कोणत्या ठिकाणी एअर स्ट्राईक
भारतीय सैन्याकडून पाकव्याप्त काश्मीर तसेच बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबादमधील ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं आहे. याच ठिकाणांहून भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला गेला होता. भारताकडून करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. “भारत महिला आणि मुलांवर गोळीबार करत आहे. मशिदी उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत”, असं मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं. मात्र भारताकडून ही एअर स्ट्राईक फक्त दहशतवादांच्या तळांवर करण्यात आली आहे.
संरक्षण मंत्रालयाची एक्स पोस्ट
India has launched #OperationSindoor, a precise and restrained response to the barbaric #PahalgamTerrorAttack that claimed 26 lives, including one Nepali citizen. Focused strikes were carried out on nine #terrorist infrastructure sites in Pakistan and Pakistan-occupied Jammu and…
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) May 6, 2025
पाकिस्तानची टरकली
भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानची टरकली आहे. पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक माध्यमांनुसार, विमानतळावर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना तात्काळ विमानतळ रिकामं करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारताकडून करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तर काही विमानं वळवण्यात आली आहेत.
