Air India : एअर इंडियाचं विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न? पायलटला सिग्नल मिळताच..; 9 जण ताब्यात
Air India : बेंगळुरूहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया विमानातील एका प्रवाशाने कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आश्चर्याची बाब म्हणजे त्याने कॉकपिटचा पासवर्डसुद्धा अचूक टाकला होता. पायलटला सिग्नल मिळताच..

गेल्या काही महिन्यांपासून एअर इंडिया ही विमान कंपनी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आता बेंगळुरूहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील एका प्रवाशाने चक्क कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. आश्चर्याची बाब म्हणजे त्या प्रवाशाने योग्य पासकोड वापरून कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु हायजॅकच्या भीतीने कॅप्टनने दरवाजा उघडला नाही. संबंधित प्रवासी इतर आठ जणांसह विमानाने प्रवास करत होता. याप्रकरणी नऊ प्रवाशांना सीआयएसएफने ताब्यात घेतलं आहे.
एअर इंडियाचं स्पष्टीकरण-
याप्रकरणाच्या बातम्या समोर आल्यानंतर एअर इंडियाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “आम्हाला वाराणसीला जाणाऱ्या विमानातील घटनेबद्दल मीडिया रिपोर्ट्समधून माहिती मिळाली. एक प्रवासी शौचालय शोधत असताना कॉकपिटजवळ पोहोचला आणि त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आम्ही प्रवाशांना खात्रीने सांगतो की विमानात कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारची चूक त्यात झालेली नाही. लँडिंगच्या वेळी अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि सध्या त्याची चौकशी सुरू आहे”, असं त्यांनी म्हटलंय.
संबंधित प्रवाशाने कॉकपिटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न का केला, यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. जर त्याला शौचालयाला जायचं होतं, तर त्याने कॉकपिटचा पासकोड अचूक कसा टाकला, याबद्दलही शंका उपस्थित होत आहेत. एअर इंडियाचं विमान IX-1086 सकाळी 8 वाजता बेंगळुरूहून निघालं होतं. हे विमान वाराणसीमध्ये उतरल्यानंतर नऊ प्रवाशांना CISF कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं.
हायजॅकची भीती
विमानातील कॉकपिट केबिनचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न होताच पायलटला सिग्नल मिळतो. एअर इंडियाच्या या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच प्रवाशाने कॉकपिट केबिनचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्याने पासकोड टाकताच पायलटला सिग्नल मिळाला. त्यानंतर लगेचच पायलटने सीसीटीव्ही फुटेज पाहिलं, तेव्हा त्याला हायजॅकची भीती वाटली आणि त्याने दरवाजा उघडला नाही. संबंधित प्रवाशाला कॉकपिटचा पासवर्ड कसा कळला, असा प्रश्न निर्माण होत आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणारा प्रवासी पहिल्यांदाच विमानातून प्रवास करत होता. त्याने असं का केलं असा प्रश्न विचारला असता, त्याने शौचालयाचं कारण दिलं. मला शौचालयाला जायचं होतं आणि तो दरवाजा शौचालयाचा असल्याचं वाटून मी आत जाण्याचा प्रयत्न केला, असं त्याने सांगितलं. परंतु जेव्हा क्रू मेंबरने त्याला सांगितलं की तो शौचालयाचा दरवाजा नसून कॉकपिटचा दरवाजा आहे, तेव्हा तो शांतपणे मागे हटला.
