हल्ली मुलींची लग्न होईपर्यंत त्या…; धर्मगुरुंचे महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान, नेमकं काय घडलं?
धर्मगुरु अनिरुद्धाचार्य यांना मुलींच्या चारित्र्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. मथुरा न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

मुलींच्या चारित्र्याबद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी धर्मगुरु अनिरुद्धाचार्य हे सध्या चर्चेत आहेत. आता त्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. मथुरा मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना अनिरुद्धाचार्य यांच्याविरुद्ध कुटुंबाची तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता त्यांना या प्रकरणी खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.
ऑक्टोबरमध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेच्या जिल्हाध्यक्षा मीरा राठोड यांनी कथाकार अनिरुद्धाचार्य यांच्या या टिप्पणीबाबत मथुरा मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर पार पडलेल्या सुनावणीदरम्यान मुख्य न्यायदंडाधिकारी उत्सव राज गौरव यांच्या न्यायालयाने ही याचिका स्वीकारली. तसेच तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर अनिरुद्धाचार्य यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आला आहे. ज्यामुळे त्यांच्या समस्या आणखी वाढल्या आहेत.
या प्रकरणातील पुढील सुनावणी १ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या दरम्यान याचिकाकर्त्या मीरा राठोड यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना शिक्षा जाहीर केली जाईल.
नेमके प्रकरण काय?
काही महिन्यांपूर्वी, कथाकार अनिरुद्धाचार्य यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात त्यांनी मुलींच्या चारित्र्याबद्दल अत्यंत अपमानास्पद टिप्पणी केली होती. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी मुलींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले होते. आजकाल मुलींची लग्न ही वयाच्या 25 व्या वर्षी होतात. तोपर्यंत त्यांनी सर्व मर्यादा ओलांडलेल्या असतात, असे विधान अनिरुद्धाचार्य यांनी केले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनिरुद्धाचार्य यांच्यावर महिला आणि विविध संघटनांकडून मोठी टीका झाली होती. त्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला.
यावरुन झालेल्या टीका आणि विरोधानंतर अनिरुद्धाचार्य यांनी काही वेळातच स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की ते महिलांचा आदर करतात. आणि त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. मात्र, त्यांची ही बाजू न्यायालयात विचारात घेतली जाईल. मीरा राठोड या अखिल भारत हिंदू महासभेच्या आग्रा जिल्हा अध्यक्षा आहेत. त्यांनी या गंभीर विषयाची दखल घेत CJM कोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिका स्वीकारून खटला दाखल करण्याचे निर्देश दिल्याने अनिरुद्धाचार्य यांना आता कायदेशीर लढाईला सामोरे जावे लागणार आहे.
