Nitin Nabin : अध्यक्षपद स्वीकारताच नितीन नबीन यांनी महाराष्ट्राच्या नेत्यावर सोपवली सर्वात अवघड राज्य जिंकून दाखवण्याची जबाबदारी
Nitin Nabin : मिशन साऊथ अंतर्गत भाजपला दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये आपली पाळंमुळे भक्कम करायची आहेत. तामिळनाडू, केरळ ही राज्यं भाजपसाठी खूप महत्वाची आहेत. पीएम मोदींसह अनेक बड्या नेत्यांची या राज्यांवर नजर आहे.

भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी खुर्ची अशावेळी संभाळलीय, जेव्हा पश्चिम बंगाल, तामिळनाडू, असम, पुदुचेरी आणि केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. यापैकी कुठल्याही राज्यात भाजपसाठी निवडणुकीची लढाई अजिबात सोपी नाहीय. नितीन नबीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार संभाळताच या पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी झटपट निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. पाच राज्यांपैकी भाजपसाठी सर्वात कठीण निवडणूक केरळची असणार आहे. नितीन नबीन यांनी केरळ विधानसभा निवडणुकीची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर सोपवली आहे.
विनोद तावडे हे महाराष्ट्रातून येणार नेते आहेत. संघटनात्मक बांधणीमध्ये तावडे अत्यंत कुशल नेते मानले जातात. विनोद तावडे यांना चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीसाठी पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. शोभा करंदलाजे यांना सहप्रभारी बनवलय. विनोद तावडे हे बिहारप्रमाणे केरळमध्ये सुद्धा कमळ फुलवणार का? अशी चर्चा सुरु झालीय.
अजून कोणा-कोणाची नियुक्ती?
आशिष शेलार यांना तेलंगण नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभारी नियुक्त केलं आहे. अशोक परनामी आणि रेशा शर्मा यांना सहप्रभारी नियुक्त केलं आहे. वरिष्ठ नेते राम माधव यांना ग्रेट बंगळुरु महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नेमणूक केली आहे. सतीश पुनिया आणि संजय उपाध्याय यांच्यावर सहप्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे.
केरळचा किल्ला जिंकायचाय
भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी केरळ किल्ला जिंकण्यासाठी बिहार विधानसभा निवडणूक विजयात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विनोद तावडे यांची निवड केली आहे. त्यांना प्रभारी बनवलं आहे. सोबतच कर्नाटकातून येणाऱ्या शोभा करंदलाजे यांनाही सहप्रभारी बनवलय.
केरळची सत्ता मिळवण्यासाठी भाजपला किती टक्के मत हवीत?
केरळमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम मतांची सत्ताधारी निवडण्यात महत्वाची भूमिका असते. म्हणून भाजपसाठी केरळचा किल्ला जिंकणं खूप कठीण आहे. भाजपचा केरळमध्ये वेगाने विस्तार होतोय. पण सत्ता स्थानापर्यंत पोहोचण्यात यूडीएफ आणि एलडीएफचा मोठा अडथळा आहे. केरळची प्रत्येक निवडणूक या दोन आघाड्यांभोवती फिरते. भाजपला 2014 साली केरळमध्ये 14 टक्के मत मिळाली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ही मतं वाढून 16 टक्के झाली. 2024 मध्ये हे प्रमाण वाढून 20 टक्के झालं. भाजपला केरळमध्ये सत्ता मिळवायची असेल तर 20 ते 30 टक्के आणि 30 ते 40 टक्के मत मिळवावी लागतील. अशावेळी विनोद तावडे यांच्यावर सर्वात कठीण टास्क नितीन नबीन यांनी सोपवलं आहे.
