मोहन भागवत यांचे 75 व्या वर्षी निवृत्ती घेण्याचे वक्तव्य, विरोधकांनी म्हटले, हा तर नरेंद्र मोदी यांना संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंह यांसारख्या मोठ्या नेत्यांना निवृत्त होण्यास भाग पाडले होते. आता पाहूया की मोदी स्वतः ते पाळतील की नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे एक वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. मोहन भागवत यांनी वयाचे ७५ वर्ष पूर्ण करणाऱ्यांना एक संदेश दिला आहे. जेव्हा ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर कोणत्याही नेत्यास शाल दिली जाते, तेव्हा त्याचा एक अर्थ असतो. त्याचा अर्थ म्हणजे त्याचे आता वय झाले आहे. तुम्ही इतरांना संधी दिली पाहिजे. मोहन भागवत यांच्या या वक्तव्याला विरोधकांनी हत्यार बनवले आहे. काँग्रेस आणि शिवसेना उबाठाने त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सप्टेंबर महिन्यात ७५ वर्षांचे होणार आहेत.
सरसंघचालक काय म्हणाले?
सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोरोपंत पिंगळे यांच्या जीवनावर लिहिलेल्या “द आर्किटेक ऑफ हिंदू रिसर्जन्स” या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन केले होते. मंदार मोरोने आणि प्रांजली काने यांनी या पुस्तकाचे लिखाण केले. या पुस्तकात संघाचे ज्येष्ठ नेते मोरोपंत पिंगळे यांचे जीवन आणि त्यांचे कार्य रेखाटण्यात आले आहे. त्यावेळी मोहन भागवत यांनी वयाची ७५ वर्ष पूर्ण करणाऱ्या नेत्यांना संदेश दिला.
मोरोपंत यांचा स्वभाव, त्याच्याबद्दलचे अनेक किस्से यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. ते म्हणाले, मोरोपंत यांचे जीवन कार्य एक परिपाठ आहे. मोरोपंत स्वतःला वाहून घेऊन त्यांनी कार्य केले. त्यांचा नावाचा डंका आजही आपल्याला ऐकायला मिळतो. ज्या प्रमाणे हनुमान चालीसामध्ये हनुमान बद्दल ‘राम काज करिबे को आतुर…’, असे म्हणतात. त्याचप्रमाणे मोरोपंत यांच्याबद्दल संघात बोलताना म्हणतात, ‘मोरोपंत संघ कार्य को आतुर’
संघप्रमुख म्हणाले, मोरोपंत ७५ वर्षांचे झाले होते, त्यावेळी वृंदावनला बैठकीत मोरोपंत यांना बोलायला लावले. ते बोलताना म्हणाले, मी उभा झालो, की लोक हसतात. मी काहीच बोलत नाही तरी लोक हसतात. कारण ते मला गंभीरतेने घेत नाही. माझा जेव्हा मृत्यू होईल, तेव्हाही लोक गोटा मारून पाहतील, मी खरंच मेलो आहे की नाही. मोरोपंत यांनी ७५ वर्ष पूर्ण करताना शाल मिळण्याचा अर्थ आता तुम्हा साइडमध्ये व्हा, आता इतरांना काम करु द्या, असे सांगितले होते, असे संघप्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले होते.
काँग्रेसने वक्तव्याचा आधार घेत म्हटले…
मोहन भागवत यांच्या या वक्तव्याचा आधार काँग्रेस नेता जयराम रमेश यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरसंघचालक मोहन भागवत यांनी आठवण करुन दिली आहे. १७ सप्टेंबर २०२५ रोजी ते ७५ वर्षांचे होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरसंघचालक मोहन भागवत यांनाही सांगू शकतात, कारण ते सुद्धा ११ सप्टेंबर २०२५ रोजी ७५ वर्षांचे होत आहे. म्हणेजेच ‘एक तीर, दो निशाने!’
शिवसेना यूबीटी नेते संजय राऊत यांनीही यावर भाष्य केले होते. संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंह यांसारख्या मोठ्या नेत्यांना निवृत्त होण्यास भाग पाडले होते. आता पाहूया की मोदी स्वतः ते पाळतील की नाही.
