‘ही तर कॉमेडियन आणि जोकरची पार्टी’ पंतप्रधानांवरील मिमिक्रीने भडकली भाजप, राहुल गांधींना सणसणीत टोला
Kiren Rijiju on Congress Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिमिक्रीने भाजपविरुद्ध काँग्रेस असा सामना रंगला आहे. काल इंदुरमध्ये राहुल गांधी यांनी छात्रो की गुंज कार्यक्रमात भाजपसह मोदींवर तिखट प्रतिक्रिया दिली. त्या कार्यक्रमात मोदींची मिमिक्री करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील एका व्हिडिओवरून भाजपविरुद्ध काँग्रेस असा सामना रंगला आहे. इंदुरमध्ये काल राहुल गांधी यांनी छात्रो की गुंज हा कार्यक्रम घेतला. त्यावेळी मिमिक्री आर्टिस्ट पुलकित मनी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. तर याविषयीचा व्हिडिओ काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स हँडलवर पोस्ट केला. या व्हिडिओत विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सुद्धा दिसले. हा व्हिडिओ री-पोस्ट करत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुद्धा त्यावर तोंडसुख घेतले.
काँग्रेस ही कॉमेडियन आणि विदुषकांची पार्टी
किरेन रिजिजू यांनी एक्सवर पोस्ट लिहित काँग्रेसला सुनावले. काँग्रेस पक्ष हा विनोदवीर आणि विदुषकांचा पक्ष झाल्याची शेलकी टीका त्यांनी केली. असच चालत राहिले तर हा पक्ष प्रवाहातून बाहेर पडेल असा टोलाही त्यांनी लगावला. त्यावर त्यांनी पुढे RIP असे लिहिले. राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील इंदुर येथील आहे. त्यावरून सध्या देशभरात गदारोळ उठला आहे.
वयोवृद्ध महिलेचा अपमान
राहुल गांधी यांच्या मंचावर नक्कलकार पुलकित मनी यांनी पीएम मोदी यांची मिमिक्री केली. त्यावेळी एका वयोवृद्ध महिलेसाठी खुर्ची मागितल्याप्रकरणाची टर उडवण्यात आली. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हा त्या वयोवृद्ध महिलेचा अपमान असल्याचे म्हटले आहे. एकीकडे आदर आणि आपलेपणा आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात एका वृद्ध महिलेचा अपमान करण्यात आला आहे.
Congress Party has become a Party of Comedians & Jokers!
They are out forever…. RIP 🙏 pic.twitter.com/80YaZfqEal
— Kiren Rijiju (@KirenRijiju) September 20, 2026
स्मृती इराणी यांच्याकडूनही समाचार
माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या या व्हिडिओवर टीकास्त्र सोडले. जेव्हा एखादा व्यक्तीवर विनाश ओढवतो, तेव्हा त्याची बुद्धी सर्वात आधी नष्ट होते, अशी टीका त्यांनी केली. भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते नाहीत, तर ट्रोल्सचे नेते असल्याचे ते म्हणाले. तर विद्यार्थ्यांच्या आडून देशात राजकारण करण्यात येत आहे, अशी टीका धर्मेंद्र प्रधान यांनी राहुल गांधी यांच्यावर केली. तर नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीवर पलटवार केला. राहुल गांधी यांनी स्टँडअप कॉमेडियन व्हावे असा टोमणा त्यांनी लगावला. भाजपच्या विविध नेत्यांकडून काँग्रेससह राहुल गांधींवर निशाणा साधण्यात येत आहे.
