मिठाई की सोनं, एका किलोची किंमत तब्बल 1 लाख 11 हजार; ‘या’ मिठाईत नेमकं काय आहे खास?
Most Expensive Sweet: तुम्ही मिठाईचा दर 500, 1000, 2000 रूपये किलो असा ऐकला असेल. मात्र एका मिठाईचा दर तब्बल 1 लाख 11 हजार रुपये किलो आहे. या मिठाईचे नाव काय आहे? या मिठाईमध्ये नेमकं काय खास आहे? ही मिठाई नेमकी कुठे मिळते? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

संपूर्ण देशात दिवाळीला सुरुवात झाली आहे. दिवाळीनिमित्त सर्वांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. अनेकजण बाजारातूनही मिठाई खरेदी करतात. त्यामुळे आता मिठाईच्या दुकानांसमोर गर्दी पहायला मिळत आहे. तुम्ही मिठाईचा दर 500, 1000, 2000 रूपये किलो असा ऐकला असेल. मात्र एका मिठाईचा दर तब्बल 1 लाख 11 हजार रुपये किलो आहे. या मिठाईचे नाव काय आहे? या मिठाईमध्ये नेमकं काय खास आहे? ही मिठाई नेमकी कुठे मिळते? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
स्वर्ण प्रसादम मिठाई
राजस्थाची राजधानी जयपूरमध्ये स्वर्ण प्रसादम नावाची मिठाई तयार करण्यात आली आहे. या मिठाईचा दर तब्बल 1 लाख 11 हजार रूपये किलो इतका आहे. त्यामुळे एक किलो मिठाई खरेदी करणे हे अनेकांच्या बजेटच्या बाहेर आहे. त्यामुळे ही मिठाई 1,2,4,6 अशा तुकड्यांमध्ये विकली जात आहे. या मिठाईच्या 25-30 ग्रॅम वजनाच्या एका तुकड्याची किंमत 3000 रुपये आहे. तसेच ही मिठाई सोन्याच्या दागिण्यांच्या बॉक्समध्ये विकली जात आहे.
मिठाई तयार करण्यासाठी खास पदार्थांचा वापर
स्वर्ण प्रसादम् या मिठाईवर मोठ्या प्रमाणात सोन्याच्या राखेचा लेप लावला जातो, ज्यामुळे ही मिठाई खास आणि महागडी बनते. या मिठाईबाबत माहिती देताना अंजली जैन यांनी आज तक या वृत्तवाहिनीला सांगितले की, आम्ही या मिठाईद्वारे आरोग्य आणि राजेशाही थाट एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. या मिठाईत पाइन नट्स, केशर आणि सोन्याची राख असे पदार्थ टाकण्यात आलेले आहेत. सोन्याच्या राखेत आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात. त्यामुळे ही हेल्थी मिठाई आहे. तसेच या मिठाईची शाही पॅकिंग केली जाते, ज्यामुळे ग्राहकाला शाही अनुभव मिळतो.
फायरक्रॅकर प्लॅटर
अंजली यांच्या दुकानात स्वर्ण प्रसादम या मिठाईसह काजू, अंजीर, ब्लूबेरी आणि सॉल्टेड बटर कारमेल हे पदार्थ वापरून बनवण्यात आलेल्या अनेक मिठाईंचा समावेश आहे. या सर्व प्रकारच्या मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच या दुकानात फायरक्रॅकर प्लॅटर मिळतो, जो ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अंजली जैन या चार्टर्ड अकाउंटंट आहेत, मात्र त्यांना ही अनोखी मिठाई तयार केल्यामुळे खास प्रसिद्धी मिळाली आहे.
