ट्रम्प यांनी खेळला मोठा डाव, पाकिस्तानच्या सर्वात जवळच्या मित्राची ताकद अनेकपटींनी वाढणार, भारताला धक्का
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा डाव खेळला आहे, त्यामुळे आता पाकिस्तानच्या मित्र देशाची ताकद वाढणार आहे, मात्र त्यासाठी त्यांनी एक अट देखील घातली आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पुन्हा एकदा एक मोठा डाव खेळला आहे. त्यांनी तुर्कस्तानला F-35 लढाऊ विमानं देण्याची तयारी दर्शवली आहे. तुर्कीला F-35 लढाऊ विमान कार्यक्रमात पुन्हा एकदा समाविष्ट केले जाऊ शकते असे संकेत अमेरिकेनं दिले आहेत. मात्र त्यासाठी तुर्कीला ट्रम्प यांनी एक अट घातली आहे. तुर्कीने युक्रेन आणि रशियामधील युद्ध थांबवण्यास आम्हाला मदत करावी असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी नुकताच व्हाइट हाऊसचा दौरा केला आहे, हा त्यांचा 2019 नंतरचा पहिलाच अमेरिकेचा दौरा आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर ट्रम्प यांच्याकडून असे संकेत देण्यात आले आहेत की जर चर्चा यशस्वी झाली तर तुर्कीवर S-400 संबंधात घालण्यात आलेले प्रतिबंध हटवले जाऊ शकतात.मात्र त्यासाठी तुर्कीला रशियाकडून कच्चे तेल आणि गॅसची खरेदी बंद करावी लागेल. तसेच एर्दोगान यांनी आपल्या प्रभावाचा वापर करून रशियावर हे युद्ध थांबवण्यासाठी दबाव आणावा असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
S-400 आणि F-35 वाद
2019 मध्ये अमेरिकेनं तुर्कीला F-35 कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. कारण त्यांनी रशियाकडून S-400 एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी केली होती. तेव्हा अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी असा दावा केला होता की जर F-35 आणि S-400 एअर डिफेन्स सिस्टीम एकाचवेळी ऑपरेट करण्यात आली तर त्याचं तंत्रज्ञान लीक होऊ शकतं, आणि ते रशियापर्यंत पोहोचेल. मात्र त्यावेळी बोलताना रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी म्हटलं होतं की आम्हाला F-35 पण पाहिजे सोबतच आम्हाला S-400 एअर डिफेन्स सिस्टीम देखील हवी आहे, त्यानंतर अमेरिकेनं तुर्कीला F-35 प्रोगाममधून बाहेर केलं होतं, त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात आले होते.
दरम्यान आता डोनाल्ड ट्रम्प यांनी हे प्रतिबंध उठवण्याचे संकेत दिले आहेत, तुर्की हा पाकिस्तानचा मित्र आहे, ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता, त्यावेळी तुर्कीने पाकिस्तानला मदत केली होती.
