FASTag: फास्टॅग नसला तर दुप्पट रक्कम भरावी लागणार नाही, ‘या’ परिस्थितीत फुकट प्रवास करता येणार
FASTag च्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. 15 नोव्हेंबरपासून जर तुमच्या वाहनात सक्रीय फास्टॅग नसेल किंवा फास्टॅगकाम करत नसेल, तर तुम्हाला दुप्पट रक्कम भरावी लागणार नाही.

वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी आहे. FASTag च्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. 15 नोव्हेंबरपासून जर तुमच्या वाहनात सक्रीय फास्टॅग नसेल किंवा फास्टॅगकाम करत नसेल, तर तुम्हाला दुप्पट रक्कम भरावी लागणार नाही. अशा परिस्थितीत आता तुम्हाला UPI द्वारे 1.25 पट टोल टॅक्स भरावा लागेल. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सध्या FASTag नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागतो.
समोर आलेल्या माहितीनुसार सध्या 98% टोल फास्टॅगद्वारे वसूल केले जातो. ज्या वाहनांचा फास्टॅग सक्रीय नसेल किंवा काम करत नसेल तर पूर्वी दुप्पट टोल भरावा लागत होता. मात्र आता युपीआयद्वारे 1.25 पट टोल भरावा लागणार आहे. तसेच जर तुमचा फास्टॅग सक्रीय असेल मात्क टोल प्लाझा मशीनमध्ये अडचण निर्माण झाल्यास तुम्ही फुकटात टोल ओलांडू शकता. तुम्हाला टोलवर थांबण्याची किंवा टोल भरण्याची गरज नाही.
वाहनचालकांचे पैसे वाचणार
तुमच्याकडे FASTag नसेल, तर तुम्हाला आता UPI द्वारे टोल शुल्काच्या फक्त 1.25 पट रक्कम भरावी लागेल. उदाहरणार्थ, जर टोल 100 रुपये असेल तर आणि तुमचा फास्टॅग काम करत नसेल तर तुम्हाला आधी रोख 200 रुपये द्यावे लागत होते. मात्र आता केवळ UPI द्वारे 125 रुपये द्यावे लागणार आहेत. यामुळे 75 रुपयांची बचत होईल. तसेच टोल प्लाझावर रोखीने होणारे व्यवहार आणखी कमी होतील आणि भ्रष्टाचारही कमी होईल.
15 नोव्हेंबरपासून नियम लागू होणार
फास्टॅगचा हा नवा नियम 15 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. तोपर्यंत अतिरिक्त दंड टाळण्यासाठी तुमच्या वाहनाचा FASTag तपासा आणि तो सक्रीय आहे याची खात्री करा. जर काही समस्या असेल तर ती दुरुस्त करा. यामुळे तुमचा प्रवास कमी पैशांमध्ये होईल.
टोल संकलनात वाढ
ऑगस्टमध्ये 7052.91 कोटी रुपयांचे टोल संकलन झाले होते. ही रक्कम मागील वर्षीच्या 5610.64 कोटींपेक्षा 26 टक्क्यांनी जास्त आहे. य़ाआधी मे 2025 मध्ये सर्वाधिक 7087.16 कोटींचा टोल वसूल झाला होता. जूनमध्ये हा आकडा 6700 कोटी रुपये होता. जुलैमध्ये 6500 कोटी रुपयांचा टोल जमा झाला होता.
