दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला कफ सिरप देण्यास बंदी, सरकारचा निर्णय
मध्य प्रदेशात कफ सिरप दिल्यानंतर लहानमुलांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाने दोन वर्षांहून कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देण्यावर बंदी घातली आहे.

मध्यप्रदेश आणि राजस्थानात कफ सिरप दिल्याने लहान मुले दगावल्याने अनेक राज्य सरकारनी या औषधांवर बंदी घातली असताना आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानंतर छत्तीसगड राज्य सरकारने दोन वर्षांच्या पेक्षा कमी वयाच्या मुलांना सर्दी-पडसे यासाठी कफसिरप देण्यावर बंदी घातली आहे.
मध्यप्रदेश आणि राजस्थानात कफ सिरप दिल्यानंतर लहान मुलांची तब्येत ढासळून त्यांचा किडनी फेल झाल्याने मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या सल्ल्यानंतर सोमवारी छत्तीसगड आरोग्य विभागाने तात्काल कारवाई करत राज्यातील दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोणत्याही प्रकारचे खोकला किंवा सर्दीसाठी कफ सिरप देण्यावर बंदी घातली आहे. या निर्णय लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी घेतला आहे.
अशा प्रकारची औषधे सामान्यत: पाच वर्षांखालील मुलांना देणे अयोग्य असते. मध्य प्रदेशातील छींदवाडा येथे कफ सिरप दिल्याने ११ हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या किडनी फेल झाल्याने हे मृ्त्यू झाले असल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर सरकारने Coldrif कफ सिरपच्या संबंधित स्टॉक आणि बाटल्या बाजारातून मागे घेतल्या असून या प्रकरणात मध्य प्रदेश सरकारे विशेष तपास पथक नेमले आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या घटनेनंतर दक्षता म्हणून केंद्र सरकारने दोन वर्षांपेक्षा लहान मुलांना कफसिरप देऊ नये असे निर्देश दिले आहेत.
छत्तीसगड राज्य आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांच्या मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांना निर्देश जारी केले आहेत. सर्व सरकारी आणि खाजगी आरोग्य संस्थांना केंद्र सरकारच्या या मार्गदर्शक तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.
औषधे देणे अनावश्यक
आरोग्य सेवा आयुक्तालयाने उच्चस्तरिय व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करुन जिल्हास्तरिय अधिकाऱ्यांना सक्त निर्देश दिले आहेत. औषधांचा वापर केवळ वैद्यकीय सल्ल्याने करावा आणि याबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे आदेश आरोग्य कर्मचारी आणि संबंधितांना दिले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लहान मुलांमध्ये सामान्यत: सर्दी आणि पडसे आपोआपच बरा होत असतो. यासाठी औषधे देणे अनावश्यक असते.
सर्वसामान्य जनतेनेही मनाने डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय औषधे घेऊ नयेत. अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील तपासणी सुरु केली आहे. औषध निर्मिती कारखाने आणि उत्पादनांचे Risk-Based Inspection करण्यासाठी औषध निरीक्षकांची पथके नेमली आहेत.
