‘INDIA’ Alliance Protest : संसद भवनाबाहेरच ‘जंतरमंतर’… अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; आंदोलन करत असतानाच महिला खासदाराची प्रकृती बिघडली

मतदार यादीतील अनियमिततेविरुद्ध 'इंडिया' ब्लॉकचा निषेध बिहारमध्ये सुरूच आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाचे खासदार निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढत आहेत, परंतु पोलिसांनी त्यांना रोखले आहे. संसदेपासून अवघ्या काही अंतरावरच खासदारांना अडवण्यात आलं.

INDIA Alliance Protest : संसद भवनाबाहेरच जंतरमंतर... अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; आंदोलन करत असतानाच महिला खासदाराची प्रकृती बिघडली
इंडिया आधाडीच्या मोर्चात पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं
Image Credit source: social media
| Updated on: Aug 11, 2025 | 1:15 PM

तब्बल दहा वर्षानंतर संसदेच्या प्रांगणात खासदारांचा एल्गार पाहायला मिळाला. मतचोरी आणि ईव्हीएम मशीनच्या विरोधात आज काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांनी एल्गार पुकारला. संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत खासदारांनी मोर्चाचं आयोजन केलं. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यामुळे संतप्त झालेल्या खासदारांनी जागेवरच बसून ठिय्या आंदोलन सुरू केलं. जोरजोरात घोषणा देत असतानाच एका महिला खासदाराची प्रकृती बिघडली. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं होतं. मात्र, त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व खासदारांना पुन्हा एकदा संसदेत नेऊन सोडलं.

राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, अखिलेश यादव, जयराम रमेश, संजय राऊत यांच्यासह अनेक खासदार या मोर्चात सहभागी झाले होते. मात्र या मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगत संसदेपासून अवघ्या काही अंतरावरच पोलिसांनी हा मोर्चा अडवला.त्यावर राहुल गांधी आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला.

पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. पण ही परवानगी झुगारून खासदारांनी मोर्चा काढला. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर पॅरा मिलिट्री फोर्स तैनात करण्यात आली होती. तसेच संपूर्ण कार्यालयाबाहेर बॅरेकेडिंग करण्यात आलं होतं. मात्र, संतप्त खासदार बॅरिकेडवर चढले. समाजवादी पक्षाचे खासदार पोलिसांच्या बॅरिकेड्सवर चढण्याचा प्रयत्न केला. पोलिस त्यांना पुढे जाण्यापासून रोखत होते, त्यामुळेच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. एवढंच नव्हे तर सपा नेते अखिलेश यादवही बॅरिकेडवर चढले.

 

टीएमसी खासदार सागरिका घोष आणि महुआ मोइत्रा या सुद्धा बॅरिकेड्सवर चढल्या. त्यानंतर अखिलेश यादव यांनी थेट धरणं आंदोलन सुरू केलं. पोलीस आम्हाला रोखत आहे, त्यामुळेच आम्ही धरणे धरत आहोत, असं अखिलेश यादव म्हणाले. तर केवळ 30 खासदार नाही तर विरोधी पक्षाचे सर्व खासदार निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत, असं जयराम रमेश म्हणाले. दरम्यान, पोलिसांनी यावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सुप्रिया सुळे यांना ताब्यात घेतलं आहे. तृणमूलच्या एका महिला खासदाराची प्रकृती या दरम्यान बिघडली.

हे सरकार घाबरलंय – प्रियांका गांधी

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. आमचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे.  हे सरकार भेकड आहे. घाबरलेलं आहे, त्यामुळेच ते असे सगळे प्रकार करत आहेत, असं म्हणत काँग्रेस खासदार प्रियांका गांधीनी सरकारवर हल्ला चढवला.

 

तर काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडलं. ” खरं सांगायचं तर ते बोलू शकत नाहीत. सत्य देशासमोर आहे. ही लढाई राजकीय नाही. ही लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे. ही लढाई एक माणूस, एक मत यासाठी आहे. आम्हाला स्वच्छ, शुद्ध मतदार यादी हवी आहे.” असं राहुल गांधीनी स्पष्ट केलं.

 

 

या मोर्चाद्वारे आम्ही शांतपणे आंदोलन करत आहोत. शांततेच्या मार्गानेच आमची लढाई सुरू राहील,  आम्ही महात्मा गांधींना आमचा आदर्श मानतो, त्या मार्गानेच आमची लढाई जारी ठेवू असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.