हाफिज सईद- मसूद अझहरची टरकली! अड्डा सोडून पळाला, पाकिस्तानी लष्कराने लपवले ‘या’ ठिकाणी
पाकिस्तानी लष्कराने मसूद अझहर, हाफिज सईद आणि सय्यद सलाहुद्दीन यांसारख्या दहशतवाद्यांना नव्या ठिकाणी लपवले आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तान बिथरला आहे. तेथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पाकिस्तानी लष्कराने मसूद अझहर, हाफिज सईद आणि सय्यद सलाहुद्दीन यांसारख्या दहशतवाद्यांना आपल्या मुख्यालयांमध्ये हलवले आहे.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात खळबळ
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यांनंतर शेजारी देशातील लष्कर आणि दहशतवाद्यांचे म्होरके उघडपणे एकत्र आले आहेत. सूत्रांनुसार, पाकिस्तानी लष्कराने दहशतवादाच्या तीन मोठ्या म्होरक्यांसह काही प्रमुख दहशतवाद्यांना आपल्या चार मुख्यालयांमध्ये हलवले आहे. इतर दहशतवाद्यांना सध्या लोकवस्तीच्या भागात राहण्यास सांगितले आहे. भारताने केलेल्या विध्वंसामुळे पाकिस्तानला दहशतवाद्यांचे नवे तळ तयार करणे सोपे राहिलेले नाही. वाचा: ऑपरेशन सिंदूर यशस्वी, बहावलपूर स्ट्राईकमध्ये मसूद अजहरचे संपूर्ण कुटुंब ठार
दहशतवाद्यांमध्ये भीतीचे वातावरण
भारताच्या ऐतिहासिक हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादाचे चार मोठे चेहरे आपल्या सुरक्षेबाबत बिथरले आहेत. त्यांच्यासह पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांनाही भीती आहे की, सध्याच्या परिस्थितीत कोणताही अज्ञात बंदूकधारी त्यांना लक्ष्य करू शकतो. भारताच्या कारवाईपूर्वीच अनेक प्रशिक्षण शिबिरांमधील दहशतवाद्यांना तिथून बाहेर पाठवण्यात आले होते. कारवाईनंतर उरलेल्या दहशतवाद्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, पुढील आदेश येईपर्यंत ते लोकवस्तीच्या भागात किंवा आपल्या घरी राहावेत.
दहशतवाद्यांचे म्होरके लष्करी मुख्यालयात हलवले
दहशतवादाचे तीन मोठे चेहरे मसूद अझहर, हाफिज सईद, सय्यद सलाहुद्दीन यांच्यासह अनेक प्रमुख दहशतवादी कमांडरांना पाकिस्तानी लष्कराच्या चार वेगवेगळ्या मुख्यालयांमध्ये हलवण्यात आले आहे. गुप्तचर सूत्रांनुसार, या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराच्या चौथ्या कोर लाहोर, पाचव्या कोर कराची, दहाव्या कोर रावळपिंडी आणि अकराव्या कोर पेशावर येथील मुख्यालयांमध्ये हलवण्यात आले आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी कमांडो तैनात करण्यात आले आहेत. तसेच, सध्या त्यांना सामान्य लोकांशी भेटण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
नवे तळ तयार करणे कठीण
पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेसाठी आता दहशतवाद्यांचे नवे तळ तयार करणे सोपे नाही. खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवादी शिबिरे उभारली जाऊ शकली असती, परंतु तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील तणावामुळे या भागात नवे शिबिर उभारणे शक्य नाही. बलुचिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीची मजबूत पकड असल्याने तिथेही दहशतवादी शिबिरे हलवता येणार नाहीत. असे मानले जात आहे की, आता फक्त पंजाब हा एकमेव पर्याय आहे, जिथे दहशतवादी शिबिरे हलवली जाऊ शकतात.
