भारतात 2021 आधी कोरोना लस येणं शक्य नाही, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा दावा

भारतात 2021 आधी कोरोना लस येणं शक्य नाही, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे अधिकारी म्हणाले आहेत (Ministry of Science and Technology on Corona Vaccine).

भारतात 2021 आधी कोरोना लस येणं शक्य नाही, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा दावा

नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) 15 ऑगस्टपर्यंत कोरोना लस बाजारात उपलब्ध होईल, असा दावा केला आहे (Ministry of Science and Technology on Corona Vaccine). मात्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कोरोना लस बाजारात उपलब्ध होण्यासाठी 2021 उजाडेल, असा दावा केला आहे. त्याचबरोबर भारतात 2021 आधी कोरोना लस येणं शक्य नाही, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे अधिकारी म्हणाले आहेत (Ministry of Science and Technology on Corona Vaccine).

“कोरोनावर जगभरात आतापर्यंत 140 लस तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी 11 लस मानवी चाचणीसाठी तयार आहेत. विशेष म्हणजे या 11 पैकी 2 लस या भारतात तयार झाल्या आहेत. मात्र, तरीही या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना लस बाजारात उपलब्ध होणं कठीण आहे”, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा : Covaxin | गुड न्यूज! भारतात कोरोनाची पहिली लस तयार, सरकारकडून मानवी चाचणीसाठी परवानगी

“भारतात जवळपास सहा कंपन्या कोरोनावर लस तयार करण्यासाठी काम करत आहेत. देशात 2 लस तयार झाल्या आहेत. यापैकी एक आयसीएमआर आणि भारत बायोटेक कंपनी यांच्या संयुक्त प्रयत्नाने तयार करण्यात आली आहे. या लसीचं नाव ‘कोवॅक्सिन’ असं आहे. या लसीला मानवी चाचणीसाठी परवानगीदेखील मिळाली आहे. तसेच ‘जायडस कॅडिला’ कंपनीनेदेखील लस तयार केली आहे”, अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिली.

“जगभरात 140 पैकी 11 लस मानवी चाचणीसाठी तयार आहेत. कोरोनाविरोधाच्या लढाईत ही एक दिलासादायक बाब आहे. कोरोनावरील लस या संकटावरील आशेचं किरण असेल”, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे अधिकारी म्हणाले.

“एखादी लस बाजारात येण्याअगोदर मोठी प्रक्रिया असते. त्या लसीचे अनेक क्लिनिक ट्रायल करावे लागतात. त्यामुळे भारतात वर्षअखेरीस कोरोना लस येणं शक्य नाही. याशिवाय कोरोनासारख्या आजाराच्या लसीची क्लिनिक ट्रायल जरुरीची आहे”, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे अधिकाऱ्यांनी सांगितलं.

जगभरातील वैज्ञानिक कोरोनावरील लस शोधण्यासाठी अथक मेहनत घेत आहेत. मात्र, अद्याप सार्वजनिक स्तरावर वापरता येईल अशी एकही लस अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. असं असलं तरी अनेक लस विकसित होत असून त्यांचं माणसांवर परिक्षणही सुरु आहे. यात काही लसचा चांगला उपयोग होत असल्याचं प्राथमिक टप्प्यात निदर्शनास आलं आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

Published On - 11:14 pm, Sun, 5 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI