NDA चं पारडं जड, 41 खासदारांचा पाठिंबा, दोन तृतीयांश बहुमत? भाजपचे मोठे संकेत
Narendra Modi Amit Shah NDA Delimitation Bill : महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी भाजपने मतांची जुळवाजुळव केल्याचा दावा करण्यात येत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हिवाळी अधिवेशनाचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच बहुमताचं गणित पक्कं झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

Women reservation bill and delimitation bill two third majority: डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याची दाट शक्यता आहे. मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण बिलासाठी मतांची जुळवाजळव करण्यात भाजपला यश आल्याचा दावा करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राजसभा खासदार नितीन नबीन यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम लवकर लागू करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे विधेयक मंजूर करण्यासाठी बहुमताचे गणित पक्कं झाल्याचं मानले जात आहे.
दोन-तृतीयांश बहुमताचा आकडा गाठला?
नारी शक्ती वंदन अधिनियम २०२३ मध्ये मंजूर झाले होते. तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी काही झाली नाही. आता केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना संबंधित घटनादुरुस्ती विधेयक मांडण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या उन्हाळी अधिवेशनात दोन्ही विधेयक सपाटून आपटल्याने मोदी सरकारला मोठा धक्का बसला होता. या बिलातील प्रस्तावानुसार, मतदारसंघ पुनर्रचना झाल्यावर लोकसभेच्या जागांची संख्या ५४३ वरून ८५० इतकी होईल. २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी संसदेत आणि राज्याच्या विधीमंडळांमध्ये महिलांची टक्केवारी ३३ टक्के इतकी होईल. जोपर्यंत मतदार संघाची पुनर्रचना होत नाही, तोपर्यंत महिला आरक्षणाचा उद्देश साध्य होणार नसल्याचा भाजपचा दावा आहे. तर विद्यमान जागांच्या संख्येवरच महिला आरक्षण लागू करण्याचा विरोधकांचा आग्रह आहे. हे दोन्ही विधेयक भाजपच्या पथ्यावर पडण्याची भीती विरोधकांना आहे.
नितीन नबीन यांचे मोठे संकेत
चंदीगड येथे महापालिका निवडणुकीसाठी नितीन नबीन यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महिलांचे हक्क, सन्मान ाणि सुरक्षेचा त्यांनी उल्लेख केला आणि नारी शक्ती वंदन अधिनियम लवकरच लागू करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला. तर हिवाळी अधिवेशन आणि संभाव्य विशेष सत्रात मतदारसंघ पुनर्रचना आणि त्यासंबंधित बिलं मांडून ती मंजूर करण्याचे संकेत भाजपकडून मिळत आहेत.
३६१ मतांचं गणित
घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेण्यासाठी लोकसभेत दोन तृतीयांश बहुमताची गरज असते. सभागृहातील सध्याच्या ५४० सदस्यांपैकी ३६१ मतांचा आकडा गाठणे आवश्यक मानले जात आहे. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे ३२० खासदार आहेत. पण विधेयक मंजुरीसाठी त्यांना अजून ४१ खासदारांची गरज आहे. त्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. गेल्यावेळी मोदी सरकारला विरोधकांनी धब्बा दिला. त्यामुळे सरकारचे हे दोन्ही विधेयक गडबडले. पण यावेळी सरकारने कंबर कसल्याची आणि विरोधकांतील काही घटक पक्षांचे पाठिंब्यासाठी मन वळवल्याचे मानले जात आहे.
