Lockdown Again In India? | ओमिक्रॉनमुळे भारत पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?

Omicron Updates | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळीही तडाख्यातून वाचण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊन लावला होता. आता ओमिक्रॉनच्या (Omicron B.1.1.529) रुपाने कोरोनाचा नवा व्हेरिएंट हातपाय पसरु पाहत आहे. कर्नाटकात दोघे ओमिक्रॉनग्रस्त सापडल्यानंतर धाकधूक वाढली आहे.

Lockdown Again In India? | ओमिक्रॉनमुळे भारत पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?
प्रातिनिधीक फोटो

मुंबई : गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा (Corona Virus) संसर्ग जगभरात पसरु लागला, आणि बहुतांश देशांनी ‘लॉकडाऊन’ (Lockdown) अंमलात आणला. ‘लॉकडाऊन’ उपयुक्त आहे की नाही, हा चर्चेचा, किंबहुना वादाचाच विषय आहे. परंतु लस उपलब्ध नसताना जीव वाचवण्यासाठी लॉकडाऊन गरजेचाच होता, असा दावा या विषयातील जाणकार आजही करतात. मात्र लॉकडाऊनचा आर्थिक फटका बसलेला देशातील मोठा वर्ग असाही आहे, ज्यांना लॉकडाऊन नकोसा वाटतो. रोगापेक्षा इलाज भयंकर या उक्तीप्रमाणे ‘लॉकडाऊन’ची भीती अनेकांच्या मनात बसली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळीही तडाख्यातून वाचण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊन लावला होता. आता ओमिक्रॉनच्या (Omicron B.1.1.529) रुपाने कोरोनाचा नवा व्हेरिएंट हातपाय पसरु पाहत आहे. कर्नाटकात दोघे ओमिक्रॉनग्रस्त सापडल्यानंतर धाकधूक वाढली आहे. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन होणार की काय, अशी शंका ‘दुहेरी लसवंतां’च्या मनात उपस्थित झाली आहे.

‘जागतिक आरोग्य संघटने’चं म्हणणं काय?

‘जागतिक आरोग्य संघटनेने’ (World Health Organization) Omicron हे व्हेरिअंट चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. ओमिक्रॉनचा जागतिक धोका ‘खूप जास्त’ आहे, असा इशारा WHO ने दिला आहे. मात्र ओमिक्रॉनचे अनेक म्युटेशन्स असून डेल्टाच्या तुलनेत हा अधिक संसर्गजन्य आहे का, किंवा त्याची तीव्रता अधिक आहे का, यावर अजूनही संशोधन सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेत काही दिवसांपूर्वी सर्वप्रथम आढळलेल्या या व्हेरिएंटबाबत अनिश्चितता कायम असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

भारतात पुन्हा लॉकडाऊन होणार का?

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत लागलेल्या लॉकडाऊनची चित्रं आजही अनेकांच्या डोळ्यासमोर ताजी असतील. घर गाठण्यासाठी शेकडो मैल पायी चालत गेलेले स्थलांतरित मजूर, रिकामे रस्ते, सर्वसामान्य कामं करताना दररोज येणार्‍या अडचणी या सर्व गोष्टी तुम्हाला आजही आठवत असतील. त्यामुळे अनेक जणांना लॉकडाऊन नकोय. पण प्रश्न कायम आहे, ओमिक्रॉनमुळे भारताला आणखी एक लॉकडाऊन अनुभवायला लागणार का?

सरकार लॉकडाऊनच्या विचारात नाही

सद्यस्थितीचा विचार करता, सरकार लॉकडाऊन लागू करण्याच्या विचारात नाही. ओमिक्रॉनबाबत पॅनिक होण्याची गरज नाही, आणि कोरोनाविरुद्धच्या लढ्यात वापरली जाणारी आपली आयुधं तशीच वापरत राहा, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी गुरुवारी सांगितलं. ही आयुधं कोणती, तर फेसमास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन. याशिवाय कोरोना लसीचे दोन डोस घेणंही गरजेचं आहे.

भारताला आणखी लॉकडाऊन परवडणारे नाही, असं अर्थ विषयातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अन्यथा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का पोहोचण्याची चिन्हं आहेत.

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील बंदी कायम

केंद्र सरकारने 15 डिसेंबरपासून नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र ओमिक्रॉनमुळे वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ती पुन्हा सुरु न करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला. डीजीसीएने सांगितले की, शेड्युल्ड कर्मशिअल आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा पुन्हा सुरु करण्याची तारीख योग्य वेळी सूचित केली जाईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 23 मार्च 2020 पासून ही उड्डाणे स्थगित आहेत.

अमेरिका-ब्रिटनमध्येही लॉकडाऊन नाही

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी ओमिक्रॉन हा काळजीचा विषय आहे, चिंतेचा नाही, असं सांगत लॉकडाऊनची गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. बहुतांश जनता पूर्णतः व्हॅक्सिनेटेड आहे, किंवा दुसरे डोस घेत आहे, मास्क घालत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. तर ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनीही इंग्लंडमध्ये लॉकडाऊनची तूर्तास गरज नसल्याचं सांगितलं.

सध्याच्या घडीला भारतात लॉकडाऊन होण्याची कोणतीही चिन्हं नाहीत. ज्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही, त्यांनी घ्यावा. त्यानंतरही मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन ही त्रिसूत्री पाळत राहावी. ओमिक्रॉनला उंबरठ्यावरुनच परतवून लावत पुन्हा लॉकडाऊनची गरज पडणार नाही, याची काळजी घेणं जागरुक नागरिकांच्याच हाती आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाचा ‘S’ Gene फॅक्टर नेमका काय? ओमिक्रॉनचा संसर्ग शोधण्यासाठी महत्त्वाची पायरी

बोगसगिरी ! ओमिक्रॉनचा पहिला पेशंट सापडला आणि तो दक्षिण आफ्रिकेला पळालाही, नेमका कसा?

मुंबई, पुणे, ठाण्याचं टेन्शन वाढलं, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित, 48 तास महत्वाचे

Published On - 1:15 pm, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI