Pahalgam Attack : पहलगामच्या हल्लेखोरांचा अजूनही शोध सुरूच, नाक्या-नाक्यावर पोस्टर्स आणि…
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी वाँटेड असून अजूनही त्यांचा शोध सुरू आहे. त्यामध्ये हाशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अली भाई उर्फ तल्हा भाई या 2 पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे तर अनंतनाग येथील स्थानिक आदिल ठोकरचाही शोध घेण्यात येत आहे.

पहलगाम येथे करण्यात आलेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्यातील मुख्य गुन्हेगार अजूनही फरार आहेत. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सुरक्षा संस्थांकडून सर्वतोपरी कसून प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात, 22 एप्रिल रोजी झालेल्या या भ्याड हल्ल्यानंतर हल्लेखोरांना पकडण्यासाठी एजन्सींनी याहल्ल्यातील गुन्हेगारांचे फोटो प्रसिद्ध केले होते आणि त्यांच्याविरुद्ध प्रत्येकी 20 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते, परंतु त्यांना पकडण्यात अद्याप यश मिळालेलं नाही. अशा परिस्थितीत, या वॉन्टेड दहशतवाद्यांचे फोटो सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील सर्वात सुंदर भागांपैकी एक असलेले पहलगाम 22 एप्रिलला पुन्हा चर्चेत आलं पण ते एका भयानक घटनेमुळे. बैसरन व्हॅलीत फिरायला आलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू केला त्यात एका परदेशी नागरिकाचाही समावेस आहे. या भ्याड हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू असून आधी त्यांची स्केच तर नंतर त्यांची पोस्टर्सही जारी करण्यात आली.
दहशतवाद्यांची माहिती मागवली
पण आता शोपियान जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी या दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत जेणेकरून त्यांना लवकर पकडता येईल. याशिवाय, दहशतवादी घटनेत सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांची माहितीही मागवण्यात आली आहे.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी वाँटेड आहेत. यामध्ये पाकिस्तानातील हाशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अली भाई उर्फ तल्हा भाई यांचा समावेश आहे तर अनंतनाग येथील आदिल ठोकर हा स्थानिक आहे.
दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी, त्यात सहभागी असलेल्या भयानक दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. तसेच जे दहशतवाद्यांची माहिती देतील, त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात येईल, असेही आश्वासन देण्यात आलं होतंय. दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवसानंतर 23 एप्रिल रोजी, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गुन्हेगारांना ठार मारण्यासाठी माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

दहशतवाद्यांचं स्केच जारी
पहिले स्केच जारी मग बक्षीसाची घोषणा
‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पहलगाममधील या पर्यटन स्थळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बहुतेक जण हे पर्यटक आणि पुरुष होते. त्यानंतर अनंतनाग पोलिसांनी त्यांच्या एक्स हँडलवरील एका पोस्ट लिहीली होती. “या भ्याड कृत्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी माहिती देणाऱ्या व्यक्तीला 20 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. तसेच, माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल.” असे त्यात जाहीर करण्यात आलं होतं.
बक्षीस जाहीर होण्याच्या काही काळापूर्वी, सुरक्षा एजन्सींनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या 3 लोकांचे रेखाचित्र जारी केले होते. तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की या 3 संशयितांचे पाकिस्तानशी संबंध आहेत. आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी त्यांची नावे आहेत. एजन्सींनुसार, तिन्ही दहशतवाद्यांची ‘कोड’ नावेही होती – मुसा, युनूस आणि आसिफ, अशी ती नावं होती.
निष्पाप पर्यटकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नंतर, भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आणि पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील अनेक ठिकाणी लक्ष्य करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यामध्ये सुमारे 100 दहशतवादी मारले गेले. मात्र, यामुळे चवताळलेल्या पाकिस्ताननेही प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली, ज्याला भारतीय सशस्त्र दलांनी योग्य उत्तर दिले. सुमारे 3 दिवस चाललेल्या या संघर्षात भारताने पाकिस्तानच्या लष्करी तळांसह अनेक ठिकाणी कारवाई केली. या संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शवली.
